महापालिका प्रभागांची आरक्षण सोडत घोषित
By Admin | Published: October 8, 2016 01:44 AM2016-10-08T01:44:12+5:302016-10-08T01:44:42+5:30
निवडणूक : चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे इच्छुकांमध्ये वाढणार चुरस
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. सोडतीनुसार, अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमातीसाठी ९, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३३ जागांसह ६१ जागांवर महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. द्वारका भागातील प्रभाग क्रमांक १५ आणि नाशिकरोड विभागातील गोरेवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक १९ हे तीन सदस्यांचे, तर उर्वरित २९ प्रभाग हे चार सदस्यांचे असणार आहेत. चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर चुरस दिसून येण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत शुक्रवारी महाकवी कालिदास कलामंदिरात काढण्यात आली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, प्रशासन उपआयुक्त विजय पगार यांनी ही प्रक्रिया राबविली. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरून ३१ प्रभाग निश्चित करण्यात आले. १२२ सदस्य संख्येमध्ये अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमातीसाठी ९, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३३ जागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. मंचावर पारदर्शक ड्रममध्ये प्रत्येक प्रवर्गासाठी चिठ्ठ्या टाकण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. प्रारंभी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील दोन जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. प्रभाग क्रमांक १५ आणि १९ हे प्रभाग तीन सदस्यीय असल्याने दोहोंमधून एक चिठ्ठी काढण्यात येऊन प्रभाग १५ मधील दोन जागा महिलांसाठी राखीव निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या १८ जागांपैकी नऊ जागांवर महिलांसाठी सोडत काढण्यात आली.
त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या नऊ जागांमधून पाच जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या. तसेच ज्या प्रभागात तीन जागा बिनराखीव होत्या, अशा दहा जागांमध्ये ज्याठिकाणी अनुसूचित जाती व जमाती महिलांकरिता आरक्षण नाही, त्यातील दोन जागांवर नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षण काढण्यात आले. त्यामध्ये सोडतीत प्रभाग १३ ब आणि प्रभाग २४ ब नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी आरक्षण निघाले. नागरिकांचा मागासप्रवर्गातील एकूण ३३ जागांमधून नंतर १७ जागांवर नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. सरतेशेवटी सर्वसाधारण गटातील एकूण ६२ जागांमधून ३० जागांवर महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. अतिशय शांततेत पार पडलेल्या या सोडतीसाठी अनेक विद्यमान नगरसेवकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती. अनुसूचित जाती व जमाती तसेच नागरिकांचा मागासप्रवर्गातील सोडत निघाल्यानंतर सभागृह निम्म्याने रिकामे झाले. सोडतीचे निवेदन मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे यांनी केले.
प्रभाग १ सर्वात मोठा प्रभाग
प्रभाग क्रमांक १ हा सर्वात मोठा, तर प्रभाग क्रमांक १९ हा सर्वात छोटा प्रभाग असणार आहे. प्रभाग १ ची लोकसंख्या ५३ हजार २९४ इतकी असून या प्रभागात बोरगड, चामरलेणे, प्रभातनगर, पत्रकार कॉलनी, कलानगर, म्हसरूळ गावठाणचा भाग आहे, तर प्रभाग १९ ची लोकसंख्या सर्वात कमी ३७ हजार ७१२ इतकी आहे. या प्रभागात गोरेवाडी, अरिंगळे मळा, भालेराव मळा, चाढेगाव, विष्णूनगर, स्टेशनवाडी, गाडेकर मळा, बनकर मळा आदि भागाचा समावेश आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती : प्रभाग ११ अ, १७ अ, १६ अ, २१ अ, १८ अ, २७ अ, २ अ, १२ अ, १ अ, ४ अ, २० अ, ३० अ, ८ अ, २२ अ, ९ अ, १ अ, ३१ अ.
अनुसूचित जमाती : प्रभाग ४ ब, १ ब, ६ अ, २७ ब, २ ब, ८ ब, २३ अ, १६ ब, ११ ब.
नागरिकांचा मागासवर्ग :- १ क, २ क, ३ अ, ४ क, ५ अ, ६ ब, ७ अ, ८ क, ९ ब, १० अ, ११ क, १२ ब, १३ अ, १६ क, १७ ब, १८ ब, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २३ ब, २४ अ, २५ अ, २६ अ, २७ क, २८ अ, २९ अ, ३० ब, ३१ ब, २४ ब, १३ ब.
सर्वसाधारण महिला : २ ड, ३ ब, ३ क, ५ ब, ५ क, ६ क, ७ ब, ७ क, ९ क, ९ ड, १० ब, ११ ड, १२ क, १३ क, १५ ब, १७ क, १८ क, २० क, २१ क, २२ क, २४ क, २५ क, २६ ब, २६ क, २७ ड, २८ ब, २८ क, २९ ब, ३० क, ३१ क.
सर्वसाधारण प्रभाग :- १ ड, ३ ड, ४ ड, ५ ड, ६ ड, ७ ड, ८ ड, ९ ड, १० क, १० ड, १२ ड, १३ ड, १४ क, १४ ड, १५ क, १६ ड, १७ ड, १८ ड, १९ क, २० ड, २१ ड, २२ ड, २३ क, २३ ड, २४ ड, २५ ड, २६ ड, २८ ड, २९ क, २९ ड, ३० ड, ३१ ड.
राखीव जागा चारने वाढल्या
आरक्षण सोडतीत यंदा चार राखीव जागा वाढल्या आहेत. त्यात ३ अनुसूचित जातीसाठी, तर एक अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी असलेल्या ३३ जागा जैसे थे आहेत. सर्वसाधारण गटातील चार जागा कमी झाल्याने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे.