फेरीवाल्यांसाठीही आता आरक्षित भूखंड
By admin | Published: July 26, 2014 12:24 AM2014-07-26T00:24:50+5:302014-07-26T00:51:46+5:30
शासनाचे निर्देश : महापालिकेने पाठविला प्रस्ताव
नाशिक : रस्त्यात कुठेही उभे राहून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आता जागा आरक्षित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने तशी तयारी केली असून, विकास आराखडा तयार करणाऱ्या नगररचना उपसंचालकांकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
देशभरात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अडीच टक्केसंख्या फेरीवाल्यांची आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील या व्यावसायिकांसाठी धोरण ठरविण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने धोरण तयार केले आहे. परंतु त्याचबरोबर लोकसंख्येच्या अडीच टक्के असलेल्या या वर्गासाठी विशेष सुविधा म्हणून भूखंड आरक्षित ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नाशिकचा विचार केला, तर सुमारे ३७ हजार लोक फेरीवाला व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यामुळे महापालिकेने आगामी विकास आराखड्यात त्यानुसार क्षेत्र आरक्षित ठेवण्याची तयारी केली आहे. नाशिक शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सध्या शासनाच्या नगररचना खात्याच्या उपसंचालकांमार्फत सुरू आहे. त्यामुळे महापालिकेने या आराखड्यातच जागा आरक्षित ठेवाव्या, अशी मागणी उपसंचालकांकडे केली आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार फेरीवाला धोरणांतर्गत जागा देण्याची तरतूद आहेच. भाजीबाजार, जॉगिंग ट्रॅक तसेच वाहनतळाच्या जागेलगत व्यावसायिकांना जागा देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार विकास आराखड्यातही आरक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)