शुक्रवारी प्रभागांची आरक्षण सोडत
By Admin | Published: October 5, 2016 01:07 AM2016-10-05T01:07:54+5:302016-10-05T01:11:00+5:30
काउंट डाऊन सुरू : राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये वाढली धकधक
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची आरक्षण सोडत येत्या शुक्रवारी (दि.७) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात काढण्यात येणार आहे. यावेळी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने राजकीय पक्षांसह इच्छुकांमध्ये धकधक वाढली आहे. येत्या शुक्रवारीच प्रभागांच्या सीमाही जाहीर केल्या जाणार असल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर आता येत्या १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर दि. १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत. तत्पूर्वी, येत्या शुक्रवारी (दि.७) प्रभागांमधील आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली जाणार असून, सोडतीसाठी पारदर्शक ड्रम वापरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. कोणत्या पदांच्या आरक्षणांची सोडत कोणत्या प्रभागातून कशाप्रकारे काढण्यात येणार आहे, याची माहिती दर्शविणारे पत्रक उपस्थिताना देण्यात येणार असून, सोडतीमध्ये आलेला जागा क्रमांक प्रोजेक्टरद्वारे मोठ्या पडद्यावर दाखविला जाणार आहे. या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. शासनाने १३ जून २०१६ रोजी केलेल्या महानगरपालिका नियमानुसार चक्रानुक्रमे आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सोडतीच्या वेळी सर्व प्रभाग दर्शविणारा एकत्रित नकाशा तसेच प्रत्येक प्रभागाचा हद्दी दर्शविणारा स्वतंत्र नकाशा लावण्यात येणार असून, प्रत्येक प्रभागाच्या सीमाही सोडतीच्या वेळी स्पष्ट केल्या जाणार असल्याने प्रभाग रचनेबाबतची उत्सुकताही त्याचवेळी संपुष्टात येणार आहे. येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत निघणार असल्याने राजकीय पक्षांसह विद्यमान नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांमध्ये धकधक वाढली आहे. (प्रतिनिधी)