बंधाऱ्यातील पाणी पिण्यासाठी आरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:51 PM2019-03-19T22:51:48+5:302019-03-20T01:07:14+5:30
विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
विल्होळी : विल्होळी येथील गौळणे लघु पाटबंधारे तलावातील पाण्याचा शेतीसाठी तसेच व्यावसायिक कामासाठी झपाट्याने उपसा केला जात असल्याने त्याला वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने विल्होळी ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा घेऊन तलावातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर केला आहे.
विल्होळी गावालगत गौळाणे लघु पाटबंधारे तलाव (एमआय टँक) असून, सदर तलावावर विल्होळी तसेच सारूळ, गौळाणे गावांच्या शेतकऱ्यांसाठी शेती तसेच नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे तलावातील पाण्याची साठवण कमी झालेली आहे. असे असताना येथील शेतकरी तलावातून शेतीसाठी व काही लोक व्यवसायासाठी पाणी उपसा करीत असून, अपुºया पावसामुळे यावर्षी लवकरच तलावातील पाणी झपाट्याने कमी झालेले असून तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.
पाऊस सुरू होण्यास अजून पाच महिने बाकी आहेत, पाणी उपसा असाच सुरू राहिला तर गावात लवकरच पाणीटंचाई निर्माण होऊन जनावरे आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल, याकरिता गौळाणे लघुपाटबंधारे तलावातील पाणी उपशावर नाशिक पाटबंधारे विभागाकडून बंधने आणणे आवश्यक आहे.
ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
सदर धरणातील वीज कंपनीचा पाणीपुरवठा आठवड्यातील फक्त चार दिवस शनिवार, रविवार, बुधवार, गुरुवार या दिवशी बंद ठेवण्यात यावा व इतर तीन दिवस फक्त दिवसा चालू ठेवण्यात यावा याकरिता या सभेने सर्वानुमते ठराव संमत करून सदर ठराव जिल्हाधिकारी नाशिक, कार्यकारी अभियंता नाशिक, पाटबंधारे विभाग, मुख्य कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठवून देण्यात आले आहे.