राखीव वनक्षेत्र : पांडवलेणी डोंगरावर भटकंती ठरणार गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:27 PM2019-05-26T17:27:47+5:302019-05-26T17:33:22+5:30
पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे.
नाशिक :पांडवलेणी अर्थात त्रिरश्मी डोंगरावर लेणीपर्यंत पर्यटक जाऊ शकतात; मात्र लेणी ओलांडून डोंगरमाथा चढणे किंवा डोंगराच्या मध्यावर थांबून राखीव वनक्षेत्रात भटकंती करणे भारतीय वन कायद्यान्वये गुन्हा ठरतो. हा संपूर्ण ९३ हेक्टरचा परिसर राखीव वन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात प्रवेश करण्यापुर्व वनक्षेत्रापालांची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक ठरते. विनापरवाना या भागात भटकंती करणाऱ्यांविरूध्द वनविकास महामंडळाकडून कारवाई करण्यात येणार आहे.
पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वनविकास महामंडळाने गंभीर दखल घेतली असून या राखीव वनक्षेत्रात अतिरिक्त वनरक्षकांची गस्त वाढवून विनापरवाना भटकंती करणाºया लोकांना चाप लावणाार आहे. काही दिवसांपुर्वीच याच भागात ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरूणाला डोंगराच्या कपारीमध्ये बसलेल्या बिबट्याने सकाळी सात वाजेच्या सुमारास पंजा मारल्याची घटना घडली होती. तसेच रविवारी पती-पत्नी या ठिकाणी डोंगरमाथ्यावर अडकले आणि यंत्रणेला ‘रेस्क्यू आॅपरेशन’ राबवावे लागले. तसेच काही उपद्रवी लोकांकडून राखीव वनक्षेत्रात सर्रासपणे भटकंती करत धुम्रपान, मद्यपान करून वनक्षेत्राला व पर्यावरणाला आणि तेथील जैवविविधतेला धोका निर्माण करण्याचाही यापुर्वी प्रयत्न झालेला आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची मागणी होत आहे. नेहरू वनोद्यानासह पांडवलेणी वनक्षेत्र संवर्धन संरक्षणासाठी वाढीव मनुष्यबळ पुरविणे गरजेचे आहे. राखीव वनक्षेत्रात नियमीत गस्त वाढविल्यास भटकंती करणा-या हौशी लोकांचा उपद्रव थांबेल असे निसर्गप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे. लेणींचे सौंदर्य बघण्यास कोणाचीही हरकत नाही; मात्र लेणी बघून झाल्यानंतर पाय-यांनी खाली उतरण्याऐवजी राखीव वनक्षेत्रात भटकंती करण्याबाबत पर्यटकांना पुरातत्व विभागाने मनाई करावी. तसेच सुचना फलक या भागात लावावेत.