महापालिकेच्या शहर अभियंतापदाचा पुन्हा खांदेपालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 12:23 AM2021-08-06T00:23:12+5:302021-08-06T00:24:30+5:30
महापालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदी मुळातच कोणी स्थायी स्वरूपात नेमले जात नाही आणि त्यातच आता प्रभारी शहर अभियंतापदाची पाठशिवणीचा खेळ सुरू असून, गुरुवारी (दि. ५) संजय विश्वनाथ घुगे यांची बदली करून त्यांच्या जागी शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घुगे हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, तीन महिन्यांनी ते पदभार सोडणार असतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
नाशिक : महापालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदी मुळातच कोणी स्थायी स्वरूपात नेमले जात नाही आणि त्यातच आता प्रभारी शहर अभियंतापदाची पाठशिवणीचा खेळ सुरू असून, गुरुवारी (दि. ५) संजय विश्वनाथ घुगे यांची बदली करून त्यांच्या जागी शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घुगे हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, तीन महिन्यांनी ते पदभार सोडणार असतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, ही नियुक्ती प्रभारी असून, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर अधिकारी मागवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. संजय घुगे हे मुळात मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता असून, त्यांच्याकडे प्रभारी शहर अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. २०१८ पासून ते काम करीत आहे. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीमुळे त्यांनी शहर अभियंतापदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्याचा संदर्भ घेऊन ही बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी घुगे यांची शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सध्या पर्यावरण अधिकारीपदाचा कार्यभार असून, त्यांच्याकडे तो कायम ठेवून कार्यभार देण्यात आला आहे. कोरोनाकाळामुळे महापालिकेत बदल्या थांबल्या होत्या. मात्र, नंतर अचानक घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे यांची बदली करून कोविड सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड यांची वर्णी त्याठिकाणी लावण्यात आली आहे. त्यानंतर काेरोनाकाळात आजारी असताना राजू आहेर यांची बदली करून सी.बी. आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता थेट शहर अभियंत्यांचीच बदली झाली आहे.
इन्फो...
महापालिकेचे उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांची कृषी प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी निवड झाली आहे. मात्र, अद्याप ते रुजू झालेले नाही तर दुसरीकडे नाशिकरोड विभागातील एका विभागीय स्वच्छता निरीक्षकाची नाशिक पश्चिममध्ये बदली करण्यात आली असून, त्यामुळे नाशिकराेड येथील पद अकारण रिक्त करण्यात आले आहे.