रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:18 AM2019-05-27T00:18:02+5:302019-05-27T00:18:53+5:30
उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत.
सिडको : उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी शिवशक्ती चौकातील बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यासंह पाऊण लाखाचा ऐवज लुटला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील शिवशक्ती चौकात राहणारे संतोष पाटील हे बारा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ६ वाजता झोपेतून उठून खाली आले असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून सुमारे पाऊण लाखाचा ऐवज लुटला. मागील आठवड्यात दि.१६ रोजी चोरट्यांनी घराच्या छतावर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व मोबाइलची चोरी केल्याचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास सिडकोतील राणाप्रताप चौकात घडला होता. एकूणच उन्हामुळे घरात गरम होत असल्याने रहिवासी घराच्या छतावर झोपत असल्याने चोरटे मात्र याच संधीचा फायदा घेत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत.
लाखोंच्या साड्यांची चोरी
सिडकोतील शिवशक्ती चौकातील रहिवासी रामसुख चौधरी यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. दुकानाच्या वरच त्यांचे निवासस्थान असून, गेल्या शुक्रवारी चौधरी यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. दुसºया दिवशी शनिवारी सकाळी चौधरी दुकान उघडण्यासाठी आले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून येवला पैठणी साड्यांचे बॉक्स, मंगल सुटिंगचे बॉक्स, चाळीस हजारांची रोकड तसेच सही केलेले दोन चेक व एटीएम कार्ड चोरी करून चोरट्यांनी पलायन केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.