लोकवस्तीत बिबट्याची डरकाळी : शहराच्या वेशीवर पिंजऱ्यांची ‘तटबंदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 02:21 PM2019-02-24T14:21:42+5:302019-02-24T14:27:22+5:30
नाशिक शहर व परिसरात बिबट्याची सध्या दहशत पहावयास मिळत आहे. यामुळेच सोशलमिडियावरही बिबट्याविषयी विविध प्रकारची विनोदी चर्चा रंगात आली आहे.
नाशिक : जिल्ह्यासह शहराच्या आजुबाजुलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. शहराच्या वेशीवरून वाहणाºया डाव्या कालव्यालगतच्या मळे परिसरापासून तर थेट देवळाली कॅम्प-भगूर परिसरात बिबट्याचा संचार आढळून येतो. त्यामुळे लोकवस्तीतून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शहराच्या वेशीवर वनविभागाकडून पिंजरे लावून जणू ‘तटबंदी’ करण्यात आली आहे. वेशीवर बिबट नर, मादी व बछड्यांचा अधिवास वाढला
नाशिक शहर व परिसरात बिबट्याची सध्या दहशत पहावयास मिळत आहे. यामुळेच सोशलमिडियावरही बिबट्याविषयी विविध प्रकारची विनोदी चर्चा रंगात आली आहे. २५ जानेवारी व १७ फे ब्रुवारी रोजी शहरातील उच्चभ्रू मानला जाणा-या सावरकरनगर या सिमेंटच्या जंगलात दोन प्रौढ नर बिबट्यांनी शिरकाव केला होता. या दोन्ही घटनांमध्ये अनुक्रमे दोन व एक असे तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. या बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागला यश आले. तसेच शनिवारी (दि.२३) भगुर गावालगत रेणुका देवी मंदिराजवळ लोकवस्तीत लावलेल्या पिंज-यात एक वर्षाचा बछडा पिंजºयात जेरबंद करण्यात आला. अद्यापही शहराच्या वेशीवर बिबट्यांचा संचार वनविभागाला आढळून येत आहे. बिबट्याने दर्शन दिले, गाय-वासरूवर हल्ला केला, कुत्रे खाल्ले अशा विविध तक्रारी शहरी भागाजवळील उपनगरांमधून वनविभागाकडे प्राप्त होत आहे. त्यामुळे वनविभागाची दमछाक होत असून पिंजरे लावायचे तर कोठे-कोठे? अन् किती? असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.