निवासी शाळा शिक्षक, गृहपाल प्रथमच होणार सन्मानित; समाजकल्याण विभागाचा पुढाकार
By संदीप भालेराव | Published: September 4, 2022 05:38 PM2022-09-04T17:38:50+5:302022-09-04T17:40:52+5:30
विभागनिहाय होणार शिक्षकांची निवड.
नाशिक : दरवर्षी शिक्षक दिनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून काही शिक्षकांना सन्मानित केले जाते. जिल्हा परिषद, महापालिका आपल्या आस्थापनांवरील शिक्षकांच्या कार्याची दखल घेते तर काही सामाजिक संस्थांकडून गुरूजनांचा गौरव केला जातो. परंतु समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळा, शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांची कधीही दखल घेतली गेली नाही. आता समाजकल्याण विभागाने शिक्षकदिनी अशा मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक दिनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचा सर्वत्र सन्मान केला जातो. समाज कल्याण विभागातदेखील प्रथमच शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व गृहपाल यांचा शिक्षकदिनी सन्मान करण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाने या संदर्भातील आदेशही नुकतेच काढले असून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार विभागस्तरावर त्या त्या विभागातील उत्कृष्ट काम करणारे तीन मुख्याध्यापक, तीन शिक्षक व शासकीय वसतिगृहातील तीन गृहपाल यांची निवड करून त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे. सोमवार ५ सप्टेंबर रोजी विभागनिहाय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत सुरू असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा, सफाई व्यवसायातील पालकांच्या मुलांसाठीच्या शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांना गाैरविण्यात येणार आहे. शिक्षक दिनी या ठिकाणी महापुरुषांचे जीवन व त्यांचे कार्य या विषयावर व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे,
समाजकल्याण आयुक्त