अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कॉलनीतील रहिवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:45+5:302021-07-15T04:11:45+5:30
देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कॉलनीतील रहिवासी त्रस्त ...
देवळा : येथील रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने मोठ्या प्रमाणात शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे कॉलनीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. कॉलनी रस्त्याने सुरू असलेली अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी रामराव आहेर गृहनिर्माण संस्थेने केली आहे. संस्थेच्या वतीने याबाबतचे निवेदन देवळा नगरपंचायत व देवळा पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र. १६ मध्ये वाजगाव व कळवण या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी रामराव हौ. सोसायटी ही कॉलनी आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, रामेश्वर, कनकापूर, कांचणे, मुलुखवाडी, शेरी, वार्शी, हनुमंत पाडा तसेच देवळा शहराच्या पश्चिम भागातील शेतकरी आपला कांदा लिलावासाठी देवळा येथे कळवण रस्त्यावर असलेल्या नवीन बाजार समिती आवारात घेऊन येतात. या कॉलनीपासून १०० मीटरवर असलेल्या देवळा शहराकडील मुख्य रस्त्याने कांदा मार्केटकडे न जाता शॉर्टकट म्हणून रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी रस्त्याने कांद्याने भरलेले ट्रॅक्टर व इतर वाहने शेतकरी घेऊन जातात. यामुळे दिवसभर रामराव हौसिंग वसाहतीत ट्रॅक्टर, पिकअप, बैलगाडी, रिक्षा आदी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. पहाटे पाच वाजेपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत दिवसभरात दोनशे वाहने या कॉलनी रस्त्याने जातात. यामुळे कॉलनीतील शांतता भंग झाली आहे. नुकतेच भुयारी गटारीसाठी झालेल्या रस्त्याचे खोदकाम केल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. यामुळे जाणाऱ्या वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धूळ उडत असते. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ येते. धूळ व ध्वनिप्रदूषणाचा येथील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. सध्या पावसामुळे कॉलनी रस्त्यावर चिखल झाला आहे.
निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष दादाजी निकम, किसन निकम, दोधू बच्छाव, दादाजी आहेर, नामदेव सोनवणे, रमेश शिंपी, विष्णू मोरे,गिरीश कचवे, पुष्पा शिंदे, मिलिंद पाटील, दौलत वाघ, देवराम शिवदे, राहुल पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------
वाहनांचा अतिवेग
२८ जानेवारी २०२० रोजी देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना कॉलनी रस्त्याने होणारी अवजड वाहतूक बंद करावी अशा मागणीचे निवेदन कॉलनीतील रहिवाशांनी दिले होते, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. कॉलनी रोडने जाणारी वाहने खूप वेगाने जातात, अपघात होण्याच्या भीतीमुळे लहान मुलांचे घराबाहेर खेळणे बंद झाले आहे. वाहनचालकांना समजावण्याचा प्रयत्न केला तर दमदाटीची भाषा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
-----------------------
देवळा येथील रामराव हौसिंग सोसायटीत वाहनाच्या धडकेमुळे नगरपंचायतीच्या बाकाची झालेली मोडतोड दाखवताना कॉलनीतील दादाजी निकम, नामदेव सोनवणे आदी ज्येष्ठ नागरिक. (१४ देवळा १)
140721\14nsk_13_14072021_13.jpg
१४ देवळा १