नांदगाव गुरूकृपा कॉलनीचे रहिवासी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:34+5:302021-06-18T04:11:34+5:30
नांदगाव : येथील गुरुकृपा कॉलनीत जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने कॉलनीतील शेकडो रहिवासी हातात कुदळ पावडे घेऊन रस्त्यावर ...
नांदगाव : येथील गुरुकृपा कॉलनीत जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने कॉलनीतील शेकडो रहिवासी हातात कुदळ पावडे घेऊन रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असताना प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा प्रसंग टळला. गुरुवारी सकाळी ९ वाजता शेकडो नागरिक रस्त्यावर जमल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक किरण देवरे, सुनील जाधव, तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अनिल कातकडे, नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे निकम आदी रस्त्याकडे आले. गुरुकृपा कॉलनी, जे. टी. के इंग्लिश मीडियम स्कूल व क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालय याकडे जाणारा रस्ता गेली २० ते २५ वर्षे वहिवाटीत आहे.
काही महिन्यांपूर्वी हा रस्ता आपल्या मालकीच्या प्लॉटमधून जात असल्याचा दावा करून पप्पू कासलीवाल यांनी तो मोठे दगड, माती टाकून बंद केल्याची माहिती रहिवाशांनी दिली. यामुळे कॉलनीतील सुमारे ४०० कुटुंबाचा मार्ग बंद झाला. कॉलनीतून बाहेर येण्यासाठी दुसरा पक्का रस्ता नसल्याने रहदारीची व पायी चालण्याची समस्या निर्माण झाली. चार-पाच महिने हा त्रास सहन केल्यानंतर रहिवासी संतप्त झाले. त्यामुळे गुरुवारी ते रस्त्यावर उतरल्याने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला. गेली २०-२५ वर्षे रस्त्याचा सार्वजनिक वापर सुरू असल्याने नगर परिषद, महसूल विभाग यांनी तो कायमस्वरूपी रस्ता अशी नोंद शासनाकडे करून प्रश्न सोडवावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. तसेच उपरोल्लेखित शाळांमध्ये शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी हाच रस्ता शाळेत जाण्यासाठी वापरतात.
संजय मोकळ, नाना राठोड, किशोर पवार, प्रशांत शिंदे, संजय खरोटे, बाबा बागुल, संजय त्रिभुवन आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
--------------------
शासकीय अधिकाऱ्यांची बैठक
नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आमदार सुहास कांदे यांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गुरुकृपा कॉलनीचे प्रतिनिधी, प्लॉट मालक, बाजूचे प्लॉटधारक व शासकीय अधिकारी यांची बैठक बोलावली आहे. रस्त्याच्या वादामुळे कॉलनीचा मंजूर आराखडा, अतिक्रमणे व बांधकामाची परवानगी यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या अज्ञात असलेल्या मंजूर रस्त्याचा शोध नागरिक घेत आहेत.
----------------------
जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करताना. (१७ नांदगाव १)
===Photopath===
170621\17nsk_4_17062021_13.jpg
===Caption===
१७ नांदगाव १