सोसायटीतील रहिवाशांनी वर्गणी जमवून केला दृष्टिहीन आत्मारामचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:32+5:302021-06-18T04:11:32+5:30
नाशिक : दृष्टिहीन असल्याने येणारी बंधने, त्यात कोरोनामुळे आर्थिक आघाडीवर झालेला खडखडाट, त्यामुळे जुळलेला विवाहदेखील करता येणे अशक्य झालेल्या ...
नाशिक : दृष्टिहीन असल्याने येणारी बंधने, त्यात कोरोनामुळे आर्थिक आघाडीवर झालेला खडखडाट, त्यामुळे जुळलेला विवाहदेखील करता येणे अशक्य झालेल्या नाशिक रोडच्या दिव्यांग आत्माराम गवळी याची अवस्था फारच बिकट झालेली होती. मात्र, नाशिक रोडच्या जयप्रकाशनगरमधील म्हाडा पुनर्वसन सोसायटीतील रहिवाशांनी पुढाकार घेत वर्गणी गोळा करून दृष्टिहीन आत्मारामचा विवाह लावून गाव करी ते राव काय करी, याच म्हणीचा प्रत्यय आणून दिला.
नाशिक रोड येथील जयप्रकाशनगर, सामनगाव रोड परिसरातील म्हाडा पुनर्वसन सोसायटीमध्ये आत्माराम गवळी हा राहतो. बालकांना लागणारी खेळणी दारोदार फिरून विकत उदरनिर्वाह करणाऱ्या आत्मारामला कोरोनाचा गत सव्वा वर्षांचा कालखंड अत्यंत आर्थिक ओढाताणीचा ठरला. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यामुळे अशा बिकट परिस्थितीमध्ये सापडलेल्या दृष्टिहीन आत्मारामचे लग्न ठरलेले असूनही त्याला विवाह करणे शक्य होत नव्हते. जळगाव येथील सुनीता नामक कन्येशी ठरलेला विवाहदेखील आर्थिक विपन्नावस्थेमुळे मोडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सोसायटीतील काही मित्रांसमोर बोलताना आत्मारामने त्याच्या मनातील ही भीती व्यक्त केली. अवघ्या आठ दिवसांपूर्वी रहिवाशांना ही वस्तुस्थिती समजली. केवळ विवाहासाठी येणारा खर्च तसेच संसारसाहित्य आत्मारामजवळ नसल्याने तो लग्न करू शकत नसल्याचे समजताच स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर आत्मारामसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. मदतीसाठी कधीही कोणाच्या पुढे हात न पसरणाऱ्या आत्मारामसाठी स्वाती खंदारे, मुक्ताबाई होबडे, वामन सांगळे, शारदा तुरे, स्नेहल इंगळे, रेखा जाधव, यांनीच आजूबाजूच्या रहिवाशांसह पुढाकार घेऊन वरबाप, वरमाय, कलवरी होण्यासह पैशांची पूर्तता केली, दीपक वाघ, सोनू वाघ यांनी मंडप, लाऊस स्पीकर यांची व आचारी ज्ञानेश्वर चांदणे व सुनील खरात यांनी मोफत भोजनाची सोय केली. यावेळी स्थानिक प्रहार संघटनेचे जिल्हा सदस्य दत्ता कांगणे यांच्याकडून लग्नाची माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गृहोपयोगी वस्तू भेट देऊन आशीर्वाद दिले. यावेळी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, दत्तू बोडके उपाध्यक्ष संतोष मानकर शहराध्यक्ष ललित पवार, जेकब पिल्ले, ऋषिकेश दापसे, जितेंद्र भावे, नगरसेवक पंडित आवारे, योगेश भोर, शेखर भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
१६विवाह