जलवाहिनीला विरोध, कळवणला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 05:26 PM2019-02-08T17:26:09+5:302019-02-08T17:26:24+5:30
पूनंदचे पाणी पेटले : भाजपावगळता अन्य पक्षांचा सहभाग
कळवण : कळवण तालुक्यातील अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीला तालुक्यातील भाजपा वगळता अन्य पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह शेतकरी, नागरिकांनी तीव्र विरोध करत कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले. ठिय्या आंदोलनानंतर मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दरम्यान शनिवारी (दि.९) सुपलेदिगर येथे अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पावर जलआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे नेते देवीदास पवार यांनी यावेळी दिली.
आमदार जे.पी. गावीत,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,डॉ भारती पवार, मविप्रचे माजी संचालक रविंद्र देवरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सभापती शैलेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जेष्ठ नेते नारायण हिरे,अण्णा पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर,उपजिल्हाप्रमुख जितेंद्र वाघ, माकपचे हेमंत पाटील, मोहन जाधव, छावाचे प्रदीप पगार आदी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांया नेतृत्वाखालील कोल्हापूर फाटा येथे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री जलवाहिनीच्या भूमिपूजनाला आले तरी तालुक्यातून पाणी बाहेर जाऊ देणार नाही. वेळप्रसंगी तुरूंगात जाऊ ,असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर यांनी दिला. पश्चिम वाहीन्यातील पाणी आमच्या धरणात टाका मग पाण्यावर हक्क सांगा. कळवण तालुक्यातून सत्तेचा गैरवापर करून पाणी पळवुन नेले जात असल्याचा आरोप माकपचे तालुका सरचिटणीस हेमंत पाटील यांनी केला. जलवाहिनीला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे यांनीही विरोध केला. पुनंदच्या पाण्यावर हक्क सांगण्याचा सटाणेकरांना अधिकार नसून केळझर व हरणबारी धरणातील पाण्यावर हक्क दाखवा. अन्य तालुक्यातील जनता हक्क सांगत असल्याने संघर्षाला सज्ज होण्याचे आवाहन वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रकाश आहेर, संतोष मोरे, रायुकॉचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण रौंदळ, रायुकॉ तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी करु न योजनेला विरोध केला. रस्ता रोको आंदोलनात परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.