पद्मावतला विरोध : नाशिकच्या गंगापूर धरणावरील करणी सेनेचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 04:21 PM2018-01-24T16:21:35+5:302018-01-24T16:25:39+5:30
‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली.
नाशिक : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला विरोध करण्यासाठी करणी सेना व हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात करण्यात आलेले जलसमाधी आंदोलन पोलिसांनी उधळून टाकले. ‘नही चलेगी, नही चलेगी पद्मावत नही चलेगी’, ‘भन्साळी मुर्दाबाद’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी गंगापूर धरणाकडे धाव घेतली; परंतु अगोदरच प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने कार्यकर्त्यांना धरणाच्या प्रवेशद्वारावरच ताब्यात घेतले.
तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या देत संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’च्या प्रदर्शनाला यापुढेही असाच विरोध सुरू ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. राजपूत करणी सेनेचे महासचिव आनंदसिंग ठोके यांनी म्हटले की, जीवंतपणी पद्मावतीमातेचा असा अपमान होताना आम्ही बघू शकत नाही, त्यामुळे प्रशासनाने आम्हाला जलसमाधी घेण्याची परवानगी द्यावी. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासर्व प्रकाराविषयी गंभीर नसल्याने याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये त्यांना भोगावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना भन्साळी यांना समर्थन देणा-या भाजपासह मनसेचाही निषेध केला. तसेच राजपूत समाजातील जे लोक विविध राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी आहेत, त्यांनी लगेचच त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असा सूरही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना कुठल्याही प्रकारचे अनुचित कृत्य करू नये, अशी विनंती केली. यावेळी महाराणा प्रताप क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, महाराणा प्रताप युवा सेनेचे माजी प्रदेशाध्यक्ष किशोर पवार, प्रसिद्धिप्रमुख करणसिंग देवरे, प्रदेश सचिव जितेंद्र सूर्यवंशी, नाना मोरखड, सचिन पवार, लखन पवार, सुरेखा राजपूत, वंदना राजपूत आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.