स्टेडियमच्या जागेत भुयारी वाहनतळाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:37 AM2018-04-22T00:37:42+5:302018-04-22T00:37:42+5:30
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला. या मैदानाचा वापर केवळ खेळासाठी व्हावा, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केलेले असल्याने वाहनतळाच्या प्रस्तावाला कायदेशीर मार्गाने विरोध करण्याची तयारीही समितीने बैठकीत दाखविली आहे.
नाशिक : छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या जागेत स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत भुयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध करण्याचा ठराव जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती शिवाजी स्टेडियम बचाव समितीच्या शनिवारी (दि. २१) झालेल्या बैठकीत करण्यात आला.
या मैदानाचा वापर केवळ खेळासाठी व्हावा, असे उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केलेले असल्याने वाहनतळाच्या प्रस्तावाला कायदेशीर मार्गाने विरोध करण्याची तयारीही समितीने बैठकीत दाखविली आहे. त्यासाठी स्टेडियम बचाव समितीतर्फे बुधवारी (दि. २५) महापौर, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह स्मार्ट सिटी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या मैदानाची मालकी जिल्हा परिषदेची असून, जिल्हा क्र ीडा संकुल समितीला सामंजस्य कराराद्वारे ताब्यात दिलेली आहे. जिल्हा क्र ीडा संकुल समितीतर्फे मैदानावर व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, ज्युडो, तलवारबाजी, कॅरम, धनुर्विद्या, अॅथलेटिक्स, फुटबॉल आदी क्र ीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा वापर करीत खेळाडू राज्य, राष्ट्रीय पातळीवर नाशिकची मान उंचावत असताना येथे वाहनतळ उभारण्याच्या निर्णयामुळे नाशिकची क्रीडा परंपरा धोक्यात येण्याची भीतीही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. याबैठकीला मंदार देशमुख, आनंद खरे, अविनाश खैरनार, रमेश भोसले, रवि मेतकर, प्रशांत भाबड, राजे शिंदे, उमेश आटवणे, सचिन निरंतर आदी उपस्थित होते.