उपनगरच्या क्रीडांगण स्थलांतरास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:20 AM2019-06-22T00:20:19+5:302019-06-22T00:20:45+5:30
उपनगर येथे प्रस्तावित असलेले क्रीडांगण आमदार देवयानी फरांदे यांनी अचानक दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकरोड : उपनगर येथे प्रस्तावित असलेले क्रीडांगण आमदार देवयानी फरांदे यांनी अचानक दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सदरचा निर्णय भेदभाव करण्यासाठी घेतल्याचा आरोप करीत हे काम याचठिकाणी व्हावे, अशा मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी (दि.२१) आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. दरम्यान, देवयानी फरांदे यांनी उपनगर परिसरातील काही नागरिकांनी क्रीडांगणाऐवजी सामाजिक सभागृहाची मागणी केल्याने हा प्रस्ताव अन्यत्र स्थलांतरित करण्याचा केवळ प्रस्ताव आहे. अजून तो संमत झालेला नाही असे सांगितले.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची उपनगर प्रभाग १७ मधील क्रीडांगण विकसित करण्याची मान्यता बदलून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग २३ दीपालीनगर येथील मोकळी जागा क्रीडांगण म्हणून विकसित करण्याचा घाट घातल्याचा आरोप यासंदर्भात नागरिकांनी केला आहे. नगरसेवक प्रशांत दिवे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आयुक्तांना निवेदन दिले. यात या ठिकाणी क्रीडांगण व्हावे यासाठी पंचवीस ते तीस वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून, आता शासनाने क्रीडांगण मंजूर होऊन कामास सुरुवात होत असताना हे काम दीपालीनगर येथे स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. सदरचे काम याच ठिकाणी कायद्याच्या चौकटीत बसवून व्हावे, अशी मागणी मोहन पवार, रोशन आढाव, अनिल देठे, संजय लोखंडे, पंकज कर्पे, सचिन भोसले यांच्यासह अन्य नागरिकांनी दिले आहे.
उपनगर येथे क्रीडांगण व्हावे यासाठी मीच महापालिका निवडणुकीच्याही आधी पाठपुरावा केला होता. परंतु या भागातील काही नागरिकांनी क्रीडांगण नको त्याऐवजी सामाजिक सभागृह हवे असा आग्रह धरल्याने क्रीडांगण दीपालीनगर येथे करण्याचा प्रस्ताव दिला. त्याचप्रमाणे त्या नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक सभागृह तसेच याच भागात साडेचार कोटी रुपयांचे उद्यानदेखील साकरण्याचा प्रस्ताव आहे. क्रीडांगण विकासाच्या प्रस्तावाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र यासंदर्भात उपनगर येथील नागरिकांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. - आमदार देवयानी फरांदे