एनआरसी, सीएए कायद्याविरोधात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:30 PM2020-01-20T22:30:49+5:302020-01-21T00:19:43+5:30

नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याच्या विषयावरून महापालिकेच्या विशेष महासभेत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपने एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात्याग केला.

Resolution against NRC, CAA law | एनआरसी, सीएए कायद्याविरोधात ठराव

मालेगाव मनपा महासभेत महापौर ताहेरा शेख यांच्यासमोर एनआरसी व सीएए कायद्याला विरोध करताना महागठबंधन आघाडी व एमआयएमचे नगरसेवक युनुस ईसा, एजाज बेग, मुस्कीम डिग्निटी, शान-ए-हिंद, माजीद युनुस, डॉ. खालीद परवेझ, अस्लम अन्सारी आदी.

Next
ठळक मुद्देमनपा महासभा : भाजप नगरसेवकांचा सभात्याग; महागठबंधन-एमआयएमची घोषणाबाजी

मालेगाव : नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याच्या विषयावरून महापालिकेच्या विशेष महासभेत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपने एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात्याग केला.
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याला महासभेत महागठबंधन आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला तर सत्ताधारी कॉँग्रेस नगरसेवकांनीही या कायद्याच्या विरोधात असल्याची भूमिका घेत तीनही कायदे रद्द करावे, देशात कायदे लागू करू नये, असा ठराव केला. भाजपच्या नगरसेवकांनी एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात्याग केला. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सावध भूमिका घेऊन विषयात सहभाग घेतला नाही. या विषयावरून महागठबंधन आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांच्या हौदा समोर येऊन जोरदार घोषणाबाजी करीत एनआरसी विरोधात फलक भिरकवले. या प्रकारामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळ व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर नीलेश आहेर, आयुक्त किशोर बोर्डे यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष महासभा व मासिक महासभा पार पडली. प्रारंभ मासिक सभेत महासभा घेण्यात आली. शहरातील रस्ते दुरुस्तीच्या विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली. नगरसेवक सुनील गायकवाड यांनी शहर अभियंता कैलास बच्छाव यांना धारेवर धरले. प्रभाग क्र. १ला ९२ लाख तर प्रभाग क्र. ३ला एक कोटी रुपये खर्च कसा, असा सवाल उपस्थित केला. शहरातील रस्ते किलो मीटरचे आहेत. याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी केली. यावर शहर अभियंता बच्छाव यांना उत्तर देता आले नाही. जलवाहिनीच्या गळतीबाबतही नगरसेवक मदन गायकवाड, रशीद शेख, अस्लम अन्सारी यांनी पाणीपुरवठा अभियंता सचिन माळवाळ यांना जाब विचारला. यावर महापौरांनी मध्यस्थी करीत पंधरा दिवसात शहरातील जलवाहिनीची गळती रोखावी, अशी सूचना केली. मोकळा भूखंड देताना टेंडर व लिलाव पद्धतीने देण्याची सूचना करण्यात आली. या विषयानंतर मासिक महासभा तहकूब करीत महापौर ताहेरा शेख यांनी विशेष महासभेला सुरुवात केली.
एनआरसी, सीएएचा विषयाबाबत विशेष महासभा बोलविण्यात आली होती. विषय चर्चेला येण्याआधीच महागठबंधन आघाडीच्या व एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांच्या हौदासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावर महापौर ताहेरा शेख यांनी विषयाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली. याला भाजपचे नगरसेवक सुनील गायकवाड यांनी आक्षेप घेत गायकवाड म्हणाले की, मालेगाव शहरात हिंदू अल्पसंख्याक आहेत. शहरात कायमच जातीय सलोखा टिकून आहे. या कायद्याबाबत देशात अनेक मतमतांतरे आहेत. मालेगाव शहरात दंगली होऊनही शहरात शांतता टिकून आहे. शहरातील वातावरण बदलले आहे. एनआरसी व सीएएला राजकारणासाठी विरोध केला जात आहे. राजकारणासाठी दुसरे फंडे शोधण्याची गरज आहे. शहराच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे म्हणत भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला तर सदरचा विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना शिवसेनेच्या नगरसेवकांची गैरहजेरी दिसून आली.
यानंतर तहकूब करण्यात आलेली मासिक सभा पूर्ववत घेण्यात येऊन विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. महासभेच्या चर्चेत डॉ. खालीद परवेझ, अस्लम अन्सारी, सखाराम घोडके, संजय काळे, गजू देवरे आदींसह नगरसेवकांनी सहभाग घेतला.

विरोधी पक्षनेते पदाला विरोध
मालेगाव : मनपा महासभेच्या प्रारंभी अतिक कमाल यांच्या विरोधी पक्षनेते निवडीला महागठबंधन आघाडीच्या शान-ए-हिंद व मुस्तिकीम डिग्निटी यांनी आक्षेप घेतला. अतिक कमाल यांनी मी राष्टÑवादीचाच आहे त्यामुळे विरोधी पक्ष नेते पदावर माझा हक्क आहे. यावेळी महापौर शेख यांनी महासभेनंतर लेखी उत्तर दिले जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक युनुस ईसा यांनी अतिक कमाल राष्टÑवादीचे आहेत तर त्यांच्या मागे किती नगरसेवक आहेत. मतदान घ्यावे, अशी उपसूचना मांडली. याविषयावरून सभागृहात दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गोंधळात हा विषय चर्चेला गेला.

Web Title: Resolution against NRC, CAA law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.