लासलगाव बाजार समिती विभाजनाचा ठराव
By admin | Published: November 14, 2015 11:13 PM2015-11-14T23:13:07+5:302015-11-14T23:14:26+5:30
लासलगाव बाजार समिती विभाजनाचा ठराव
लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आता तिसऱ्यांदा विभाजन होण्याची शक्यता असून, शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती होण्यासाठी ठराव पारीत करण्यात आला आहे.
शनिवारी सभापती नानासाहेब पाटील यांच्या अध्यक्षततेखाली संचालक मंडळाची सभा पार पडली. यावेळी उपसभापती इंदुमती तासकर, संचालक जयदत्त होळकर, शिवाजीराव ढेपले, बाळासाहेब क्षीरसागर, विजय सदाफळ, भास्करराव पानगव्हाणे, पंढरीनाथ थोरे, राजेंद्र डोखळे, शिवाजी तासकर, तानाजी पूरकर, नंदकुमार डागा, प्रमोद शिंदे, सुरेखा नागरे, राजाराम दरेकर, छाया इकडे, बबनराव सानप, दिलीप गायकवाड व सचिव बी.वाय होळकर आदि उपस्थित होते.
या सभेत लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षत्र ६२ गावांचे असून, त्याचे विभाजन करून परिसरातील ३३ गावांकरिता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, तर निफाड, नैताळे व उगाव या तीन उपआवारासाठी निफाड येथे कार्यालय असणारी निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती होण्यासाठी ठराव बहुमताने पारीत झाला, तर लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील ३३ गावांमध्ये लासलगाव येथील मुख्य आवारासह विंचूर व खानगावनजीक हे दोन उपआवार असण्याची शक्यता आहे. बाजार समितीला चालू आर्थिक वर्षात तीन कोटी १३ लाख ७३ हजार रु पयांचा खर्च वजा जादा वाढ झालेली आहे तर चालूवर्षी लासलगाव येथील बाजार समितीच्या आवारात सव्वासहा अब्ज रुपयांची उलाढाल झाली आहे. तसेच गुंतवणूक दहा कोटी रु पयांची आहे. यापूर्वी निफाड तालुका व चांदवड तालुक्याकरिता एकच लासलगाव कृषी उत्पन्न समिती होती. त्यानंतर १ आॅक्टोबर १९८२ रोजी विभाजन होऊन निफाड तालुक्यातील गावांकरिता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची, तर चांदवड तालुक्यातील गावांची चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. त्यानंतर २८ डिसेंबर १९९५ रोजी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून लासलगाव व पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. या दोन्ही वेळेस शासन नियुक्त संचालक मंडळात सत्ताधारी नेत्यांसह संचालक होते. त्यानंतर शनिवारी (दि.१४) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळाने लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा ठराव बहुमताने सहमत केला आहे.
संचालक मंडळाची मुदत दि. ३ नोव्हेंबर रोजी संपलेली आहे. या नवनिर्मित लासलगाव व निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळाची घोषणा करण्याची भाजपा व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची हालचाल सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, राज्यातील कृषी उत्पन्ना बाजार समितीच्या निवडणुकांकरिता शासनाने दि. २२ जानेवारी २०१६ पर्यंत घेण्यास मुदतवाढ दिलेली आहे. (वार्ताहर)