सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देण्याचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:03 AM2018-10-30T00:03:48+5:302018-10-30T00:04:42+5:30
आदिवासी वारली समाजातील बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देऊन अवाजवी खर्चाला फाटा द्यावा, तसेच लग्न सोहळ्यातील मानपान बंद करून त्याऐवजी वधू-वरांच्या पित्यांना कर्जमुक्तीसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श ठेवावा, असा ठराव आदिवासी वारली समाजाच्या वधू-वर सुचक मेळाव्यात सर्वानुमते घेण्यात आला.
पंचवटी : आदिवासी वारली समाजातील बांधवांनी यापुढे सामुदायिक विवाह सोहळ्यांना उत्तेजन देऊन अवाजवी खर्चाला फाटा द्यावा, तसेच लग्न सोहळ्यातील मानपान बंद करून त्याऐवजी वधू-वरांच्या पित्यांना कर्जमुक्तीसाठी आर्थिक मदत करून समाजापुढे आदर्श ठेवावा, असा ठराव आदिवासी वारली समाजाच्या वधू-वर सुचक मेळाव्यात सर्वानुमते घेण्यात आला. वारली समाजाचा वधू-वर मेळावा रविवारी (दि.२८) तपोवनातील भारत सेवाश्रम संघ येथे संस्थापक अध्यक्ष नवनाथ हुमन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ पागी, किशोर मानभाव, योगेश रिंजड, सुनील मानभाव, कृष्णा भडांगे, भारत थाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात वारली समाजाचा पहिलाच वधू-वर मेळावा झाला. यावेळी उपवधू-वरांनी स्वत:चा परिचय करून दिला. यावेळी झालेल्या मेळाव्यात सर्व समाज बांधवांनी यापुढे आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, पदवीधर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे कल वाढवावा, शासकीय नोकरीत असणाऱ्या समाजातील प्रत्येक बांधवाने एक विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घ्यावा, वारली शिक्षण फंडाची स्थापना करणे, तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्याला उद्भवणा-या अडीअडचणी सोडविण्यासाठी समाजाच्या माध्यमातून प्रयत्न करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येऊन विवाह सोहळ्यात होणाºया अवाजवी खर्चाला फाटा देत सामुदायिक विवाहांना उत्तेजन देण्याचा ठराव यावेळी सर्वानुमते करण्यात येऊन नाशिकमध्ये वारली भवन उभारण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.
मोफत क्लास
वारली समाजाच्या बांधवाने हिरावाडी परिसरात समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहे. या मार्गदर्शन व क्लासेसमध्ये येणाºया समाजातील विद्यार्थ्यांना लोकसेवा व राज्यसेवा परीक्षांबाबत मार्गदर्शन करून क्लासेस मोफत घेतले जातात त्यासाठी समाजातील बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.