संकल्प पूर्ण, ३४ वर्षांनी घालणार चप्पल; लालचंद टाटिया रामललाच्या दर्शनाला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 08:29 AM2024-01-25T08:29:24+5:302024-01-25T08:30:13+5:30
१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते.
नाशिक : अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात अनेक जणांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मंदिराचे बांधकाम झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ घेणारे लाखो कारसेवक देशभरात सापडतील. नाशिकमधील लालचंद टाटिया या कारसेवकाने तर थेट बांधलेल्या मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेतल्यावरच पादत्राणे घालेन, असा संकल्प केला आणि आता तब्बल ३४ वर्षांनंतर ते अयोध्येला जाऊन आपला संकल्प पूर्ण करणार आहेत.
१९९० च्या काळात राम मंदिराच्या आंदोलनात सक्रिय झालेल्या कारसेवकांमध्ये नाशिकमधील लालचंद टाटिया एक होते. नाशिकहून टाटियांसह ११ जण अयोध्येला गेले होते. आंदोलनात सक्रिय तर होतोच; परंतु मंदिर होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निश्चय केला आणि त्याचे व्रतासारखे ३४ वर्षे पालन केले. आता मंदिर बांधलेले पाहून समाधान वाटते. कधी एकदा राममंदिरात जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतो, असे झाले आहे. दर्शन घेतल्यानंतरच अयोध्येत मी चप्पल घालणार आहे, असे ते म्हणाले.
मंदिरासाठी लढणाऱ्या ४०० कारसेवकांनी बलिदान दिल्यानंतर आता काही झाले तरी मंदिराचे निर्माण करायचेच असा निश्चय केला. मंदिरासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा निर्णय करीत तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निश्चय केला. आजपर्यंत तो पाळतो आहे. - लालचंद टाटिया
तत्कालीन प्रवासाला दिला उजाळा
नाशिकहून टाटियांसह अनेकजण अयोध्योकडे निघाले होते. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश ही दोन राज्ये पार करायची होती. वाटेत भगवा रंग दिसला तरी पोलिसांचा त्रास सहन करावा लागत होता, असे टाटियांनी सांगितले. आता मंदिर बांधलेले पाहून समाधान वाटते. मी सुमारे ६४ वर्षांचा आहे. कधी एकदा रामंदिरात जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतो, असे झाले आहे. दर्शन घेतल्यानंतरच अयोध्येत मी चप्पल घालणार आहे.