अवैध वाळू उपशाबाबत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:13 PM2020-02-22T23:13:46+5:302020-02-23T00:22:12+5:30
मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या मोसम नदीकाठच्या तीनही ग्रामपंचायतींनी अवैध वाळूू उपशाबाबत ठराव संमत करून महसूल प्रशासनाला सादर केले आहे.
वडनेर : मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या मोसम नदीकाठच्या तीनही ग्रामपंचायतींनी अवैध वाळूू उपशाबाबत ठराव संमत करून महसूल प्रशासनाला सादर केले आहे.
मोसम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच बैलगाडीतून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सातत्याने घटत चाललेले पर्जन्यमान व वाढत चाललेला दुष्काळ यामुळे शेतीप्रश्न गंभीर झाला आहे. यातच हरणबारी धरणातून वेळोवेळी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनमुळे काहीअंशी पाणीप्रश्न सुटण्यास मदत होते. परंतु मोसम नदीतून होणाºया वाळु उपसामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. सावतावाडी, वडनेर, खाकुर्डी या नदीकाठच्या तीनही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा, असा ठराव केला आहे. ठरावाची प्रत खाकुर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना देण्यात आली आहे. यावेळी खाकुर्डीचे उपसरपंच कृष्णा ठाकरे, अरुण ठाकरे, रावसाहेब ठाकरे, किशोर ठाकरे, संदीप ठाकरे, विनोद ठाकरे, राजेंद्र ठाकरे, तात्या देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, यावर महसूल विभागाने गांभीर्याने न घेतल्यास ग्रामस्थांकडून आक्रमक पवित्रा घेतला जाईल. तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना धडा शिकविला जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आता संबंधित विभाग कधी कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.