ग्रामसभा न घेण्याचा ठराव
By admin | Published: January 30, 2015 12:50 AM2015-01-30T00:50:16+5:302015-01-30T00:50:25+5:30
स्मशानभूमीचा प्रश्न न सुटल्याने निकवेलकर नाराज
निकवेल : निकवेल येथे जोपर्यंत स्मशानभूूमीच्या बांधकामाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत येथे ग्रामसभा न घेण्याचा ठराव ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेमध्ये केल्याने प्रशासकीय कामामध्ये होत असलेली दिरंगाई यानिमित्ताने समोर आली.
निकवेल ग्रामपंचायतमध्ये सरपंच उखूबाई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी शासकीय परिपत्रकाचे वाचन ग्रामसेवक निकम यांनी केले. तसेच या परिपत्रकात विविध विषयांवर ग्रामसभेने मंजुरी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी स्मशानभूमी का होत नाही? ती बऱ्याच वर्षांपासून मोडकळीस आलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये गावामध्ये पाच ते सहा व्यक्तींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अंत्यविधी नदीकाठी कुठे तरी केला जातो. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत निकवेलमध्ये नवीन स्मशानभूमी होत नाही तोपर्यंत यापुढे ग्रामसभा घेऊच नये, असा ठरावच ग्रामसभेने केला. त्यामुळे पुढील विकासकामांना अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागणार आहे. निकवेल येथील स्मशानभूमी गेल्या कित्येक दिवसांपासून मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे त्या स्मशानभूमीमध्ये कोणीच अंत्यसंस्कार करत नाही.
शासनाने निकवेल ग्रामस्थांची समस्या लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी भिका वाघ, केवल सोनवणे, मन्साराम, पोपट म्हसदे, संजय वाघ, सुनील वाघ, चिंतामण वाघ आदि ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसभेमध्ये गावातील स्वच्छतेसंदर्भातही ग्रामस्थांनी गाऱ्हाणी मांडली. त्यामध्ये गावामध्ये गटारी साफसफाई करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच निर्मलग्राम, ज्यांच्या घरी शौचालय नाही अशा लाभार्थींना शौचालय बांधण्यात प्रोत्साहन करण्यात आले व अशा लाभार्थींना शासनाकडून बारा
हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असे आवाहन यावेळी ग्रामसेवक निकम यांनी केले. (वार्ताहर)