कालबद्ध पदोन्नतीचा ठराव विखंडित
By admin | Published: May 7, 2017 01:12 AM2017-05-07T01:12:19+5:302017-05-07T01:12:28+5:30
महासभेने सन २०१४ मध्ये केलेला ठराव शासनाच्या नगरविकास विभागाने विखंडित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेतील सुरक्षा विभागात १२ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या सुरक्षा रक्षकांना शैक्षणिक अर्हता नसतानाही कालबद्ध पदोन्नती देण्याचा महासभेने सन २०१४ मध्ये केलेला ठराव शासनाच्या नगरविकास विभागाने विखंडित केला असून, कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक अर्हतेत शिथिलता देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
जानेवारी २०१४ मध्ये झालेल्या महासभेत सुरक्षा विभागात गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षे पूर्ण होऊनदेखील प्रशासनाकडून वेळोवेळी शैक्षणिक पात्रता नसल्याचे कारण पुढे करून त्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यापासून डावलण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
शासन नियमानुसार, ज्या कर्मचाऱ्यांना १२ वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्यांना पदोन्नती मिळाली नसेल तर त्यांची कुंठितता घालविण्यासाठी कालबद्ध पदोन्नतीची वेतनश्रेणी लागू करण्यात येते. यापूर्वी, ३० मे २०११ रोजी झालेल्या महासभेत काही कर्मचाऱ्यांना त्यांचा प्रदीर्घ सेवाकाळ लक्षात घेता, त्यांची कुंठितता घालविण्यासाठी सुधारित वेतनश्रेणी देण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्याचाच आधार घेत महासभेने सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांविषयीचा ठराव मंजूर केला होता.
परंतु, सदरचा ठराव नियमबाह्य असल्याने आयुक्तांनी तो शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठविला होता. त्यानुसार, शासनाने शैक्षणिक अर्हतेत शिथिलता देऊन योजनेचा लाभ देण्याची तरतूद नसल्याचे कारण दर्शवत सदरचा ठराव हा महापालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध असल्याने विखंडित केला आहे.