छटपूजेतून गोदा स्वच्छता संवर्धनाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:34 AM2017-10-26T00:34:42+5:302017-10-26T00:34:50+5:30
उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड आदी राज्य तसेच नेपाळमधील काही भागातून नाशिक शहरात रोजगार व उद्योग-व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा सण तथा उत्सव गुरुवारी (दि. २६) गोदा घाटावर साजरा होत आहे. या छटपर्वानिमित्त आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करण्याबरोबर गोदा स्वच्छता व संवर्धनाचाही संकल्प करण्यात येईल. त्यासाठी छटपूजेनंतर स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येणार आहे.
नाशिक : उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड आदी राज्य तसेच नेपाळमधील काही भागातून नाशिक शहरात रोजगार व उद्योग-व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा सण तथा उत्सव गुरुवारी (दि. २६) गोदा घाटावर साजरा होत आहे. या छटपर्वानिमित्त आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करण्याबरोबर गोदा स्वच्छता व संवर्धनाचाही संकल्प करण्यात येईल. त्यासाठी छटपूजेनंतर स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येणार आहे. दिवाळी सणानंतर लगेच चार-पाच दिवसांनी येणाºया छटपर्वात उत्तर भारतात वाराणसी येथे गंगाघाटावर गंगा संवर्धनाचा संकल्प राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारचा संकल्प करीत मोशी येथे इंद्रायणीच्या घाटावरदेखील नदी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे. याच प्रकारचा संकल्प गोदा घाटावर जमणाºया उत्तर भारतीय भाविकांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. छटपर्व किंवा छटपूजा हा सण तथा उत्सव कार्तिक शुक्ल पक्षाच्या षष्ठीला साजरा करण्यात येतो. सूर्योपासनेसाठी साजºया होणाºया या लोकोत्सवात उत्तर भारतातील बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशाचा काही भाग, नेपाळमधील तराई क्षेत्रात हा लोकोत्सव साजरा करण्यात येतो. उत्तर भारतीय समाजात छटपूजेला लोकआस्थेचे महापर्व समजले जाते. कार्तिक शुक्ल षष्ठीला सर्व उत्तर भारतीय कुटुंब नदीकिनारी येऊन सूर्याची उपासना करतात. चार दिवस चालणाºया या सणाला पहिल्या दिवशी भात आणि भोपळ्याची भाजी सेवन करून दुसºया दिवशी उपवासाला प्रारंभ होतो. दिवसभर अन्नत्याग करून सायंकाळी ७ वाजता खीर करून पूजेनंतर प्रसाद म्हणून त्याचे सेवन करण्यात येते, यालाच ‘खरना’ असेही म्हणतात. त्यानंतर तिसºया दिवशी मावळत्या सूर्याला दुधाचे अर्घ्य अर्पण करून चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उपवास सोडण्यात येतो. या सण-उत्सवात सूर्याेपासनेचे महत्त्व असून, पुराणग्रंथात या पूजेचा उल्लेख आहे. या पूजेसाठी नदीच्या घाटावर सर्व महिला एकत्र जमून तीन, पाच किंवा सात उसाची झोपडी करून त्यात सूप किंवा परडीत पूजेचे साहित्य, दूध, फळे मांडून सूर्य, नदी आणि देवदेवतांची पूजा करतात. यानिमित्त आरती व भक्तिगीतेही म्हटली जातात. गोदाघाटावर गांधी तलावानजीक गुरुवारी (दि. २६) नाशिकस्थित उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातील काही भागातील आणि नेपाळमधील काही प्रांतातील स्त्री-पुरुष एकत्र येऊन ही छटपूजा करणार आहेत. यावेळी गोदावरी नदीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, तसेच छटपर्वानंतर दुसºया दिवशी गोदाघाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे उत्तर भारतीय समाजबांधवांनी सांगितले.
वर्षातून दोनवेळा येते छटपर्व
छटपर्व वर्षातून दोनवेळा साजरे होते. चैत्र शुक्ल पक्षातील षष्ठीला चैतीछट तर कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठीला कार्तिक छट म्हटले जाते. स्त्री-पुरुष दोघेही हा सण साजरा करतात. विशेषत: परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी महिला या सणाला व्रत करतात. पुत्रप्राप्ती, परिवाराला आरोग्य व सुखशांती लाभावी म्हणून छट पर्वाचे व्रत महिला करतात.