हिसवाळ शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वनिर्मित मातीचे दिवे वापरण्याचा संकल्प
By admin | Published: October 26, 2016 11:08 PM2016-10-26T23:08:32+5:302016-10-26T23:08:36+5:30
हिसवाळ शाळेतील विद्यार्थ्यांचा स्वनिर्मित मातीचे दिवे वापरण्याचा संकल्प
गिसाका : हिसवाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दीपावली सणाचे औचित्य साधून मातीचे दिवे बनविण्याचा उपक्रम राबविला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हस्तकलेतून स्वनिर्मित दिवे बनविण्याचा आनंद घेतला. विविध प्रकारचे दिवे बनवून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला. सध्या बाजारात परदेशी व चिनी बनावटीचे दिवे मोठ्या प्रमाणात येत असल्याने ते न घेता स्वनिर्मित बनावटीचे दिवे लावण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला. एवढेच नव्हे तर स्वत:च्या कुटुंबाबरोबरच शेजारील तीन ते चार कुटुंबांना स्वनिर्मित दिवे लावण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले. दिवे बनविण्याचे प्रात्यक्षिक कार्यानुभव शिक्षिका प्रियंका चव्हाण यांनी दिले. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, शिक्षक प्रवीण शेवाळे, शांतीलाल चव्हाण, भावलाल खवळे यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)