पाणी आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवू
By admin | Published: March 21, 2017 12:02 AM2017-03-21T00:02:04+5:302017-03-21T00:02:17+5:30
दिलीप स्वामी : गिरणा उजवा कालवा कृती समितीचे आंदोलन स्थगित
मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांना पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यास पाणी सोडावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथे जलकुंभावर चढून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाइल आंदोलन केले होते. उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. असे असले तरी भविष्यात सौंदाणेसह अकरा गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनल्यानंतर समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्याद्वारे सौंदाणे, टाकळी, सोनज, नांदगाव, मुंगसे, वाके, मांजरे, शिरसोंडी, कौळाणे, नगाव, वऱ्हाणे या गावांना पिण्याचे पाणी पुरवावे या मागणीसाठी गिरणा आरक्षण कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांताधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली होती. प्रांताधिकारी मोरे यांच्या पाहणीनंतर गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी सोडल्यानंतर केवळ सदरचे पाणी सौंदाणे गावापर्यंतच आले. उर्वरित पुढील नऊ गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथील जलकुंभावर चढून शोले स्टाइलने आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदारांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती निष्फळ ठरली. अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पाण्याचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)