राष्ट्रपती पदक विजेते पोलीसांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 04:32 PM2018-08-16T16:32:47+5:302018-08-16T16:36:12+5:30
नाशिक: विशेष उल्लेखनीय व शैर्यपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक विजेते शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, सहायक उपनिरिक्षक बाळू भवर, परिमंडळ एकचे उपआयुक्त अरुण अहिरे, अंबड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरिक्षक आरिफखान पठाण, सुभाष जाधव, नंदकुमार मिसर यांचा महाजन यांनी यावेळी सन्मान केला.
‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ
नाशिक : राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी लोकाभिमूख योजनांची माहिती जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणा-या जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशाासनाच्या ‘माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला.
आदिवासी दुर्गम भागातील सर्वसामान्यांपर्यंत शासकिय योजनांची माहिती वेळोवेळी पोहचत नाही, यामुळे योजनांद्वारे मिळणा-या लाभापासून त्यांना वंचीत रहावे लागते. दुर्गम भागात शासकिय योजना पोहचविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, उच्च शिक्षण विभाग व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या ‘युवा माहिती दूत’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी महाजन म्हणाले, शासकिय योजनांचे बहुतांश लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्रयरेषेखालील आणि दुर्गम भागात वास्तव्यास राहत असल्याने त्यांना वेळोवेळी माहिती मिळत नाही. यामुळे राज्यभरातील एक लाख युवकांच्या माध्यमातून सुमारे ५० शासकिय योजनांची माहिती पोहचविली जाणार आहे.