महिलांचा आदर राखा
By Admin | Published: March 9, 2017 01:55 AM2017-03-09T01:55:37+5:302017-03-09T01:55:49+5:30
नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही
नाशिक : सोनेनाणे, दागदागिने, कपडालत्ता याहीपेक्षा महिलांना आज सर्वाधिक आदराची गरज आहे. दुर्दैवाने या साऱ्या गोष्टी अधिक मिळतात पण आदर मिळत नाही. महिलांना त्या करत असलेल्या छोट्या-मोठ्या गोष्टींचे कौतुक अपेक्षित असते, दखल घेणे अपेक्षित असते, असे मत सनदी लेखापाल, वास्तुविशारद, विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त, अॅडव्होकेट, डॉक्टर, स्पेस एज्युकेटर, पोलीस उपनिरीक्षक, उद्योजक, आयकर आयुक्त यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केले.
‘लोकमत’ आणि ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया, नाशिक शाखा’ यांच्या वतीने झालेल्या या राउंड टेबलमध्ये कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाचा ताळमेळ, वाढते घटस्फोट, महिलांचे समाजातील स्थान, महिलांसाठी करिअरच्या नवनव्या संधी या विविध विषयांवर विविध प्रकारची मते व्यक्त झाली.
वास्तुविशारद सारख्या क्षेत्रात काम करताना त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी केलेल्या कामाचा अभ्यास केला जातो. ताणतणावावर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे असल्याचे मत वास्तुविशारद रुपाली जायखेडकर यांनी व्यक्त केले. विशिष्ट कामे महिलांनीच करावी, असे गृहीत न धरता सर्व कामांची जबाबदारी घरातील प्रत्येक सदस्याची असेल असे नियोजन करावे, आपल्या घराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी सांघिकतेने कामे करावीत, असे मत डॉ. चारुता बापये यांनी व्यक्त केले. मुला-मुलींवर केलेले संस्कार हे महत्त्वाचे असतात. त्यांना कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगितल्यास ते घटस्फोटापर्यंत येणार नाहीत, असे मत सनदी लेखापाल अर्चना जांगडा यांनी व्यक्त केले.
मातांनी आपल्या मुलांना महिलांप्रती आदराने वागण्याची शिकवण देणे गरजेचे असून महिलांबाबतीत ते संवेदनशील असल्यास तिच्याही सुख-दु:खात समरस होऊ शकतील, असे मत सनदी लेखापाल मधुरा ठक्कर यांनी व्यक्त केले. नोकरी-व्यवसायाप्रमाणेच घरही महत्त्वाचे आहे याचे भान महिलांनी ठेवल्यास घटस्फोटापर्यंत वेळ जाणार नाही. घर-नोकरी दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करावा, असे मत सोनाली चांडक यांनी व्यक्त केले. हल्लीची मुलं-मुली स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करत असून कुठे, कोणाशी कसे वागावे याचे त्यांना भान उरलेले नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या वर्तणुकीचा मागोवा घ्यावा, असे मत विक्रीकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. लग्न करण्यापूर्वीच मुला-मुलींचे समुपदेशन करून द्यावे व त्यांना येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून द्यावी, असे मत मेहता पेट्रोलपंपच्या संचालिका शर्मिला मेहता यांनी व्यक्त केले. चुकीच्या पद्धतीने शिकविल्या जाणाऱ्या स्त्रीत्वाच्या संकल्पनेवर नव्याने काम करण्याची वेळ आली असून, वाढत्या घटस्फोटांचा समाजाने गांभिर्याने विचार करावा, असे मत अॅड. राजश्री बालाजीवाले यांनी व्यक्त केले. महिलेच्या प्रगतीत कुटुंबाचा पाठिंबा, सहकार्य अतिशय महत्त्वाचे ठरते, असे मत स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी व्यक्त केले. हल्लीच्या तरुणाईमध्ये सहनशक्ती राहिली नसल्याने आणि नकार पचवायची सवयच नसल्याने घटस्फोटांबरोबरच आत्महत्त्या, ताणतणाव, मानसिक-शारीरिक आजार यांचेही प्रमाण वाढले असल्याचे मत प्रा. सोनाली चिंधडे यांनी व्यक्त केले. हल्लीची पिढी निरनिराळ्या क्षेत्रात भराऱ्या घेत असली तरी त्यांच्यामध्ये दृढनिश्चयाचा अभाव दिसतो. भविष्यात काय करायचे आहे याचे पालक आणि पाल्य दोघांकडेही चित्र स्पष्ट असायला हवे, असे मत सनदी लेखापाल रेखा पटवर्धन यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)