देशाला कांदा पुरविण्याची जबाबदारी नाशिकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:38 AM2017-09-09T00:38:00+5:302017-09-09T00:38:04+5:30
महाराष्टÑवगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले, अशा वेळी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागणी तितका पुरवठा या बाजारपेठेच्या सूत्राचा आधार घेतला.
नाशिक : महाराष्टÑवगळता अन्य राज्यांना महापुराचा फटका बसल्याने कांद्याचे उत्पादन घटले, अशा वेळी उन्हाळ कांद्याची साठवणूक करून ठेवलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकºयांनी मागणी तितका पुरवठा या बाजारपेठेच्या सूत्राचा आधार घेतला. परिणामी गेल्या महिन्यापासून देशांतर्गत सर्वच राज्यांना कांदा पुरविण्याची जबाबदारी एकट्या नाशिक जिल्ह्यावर येऊन पडली. आगामी दीड महिन्यात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांदा आपली तेजी राखणार असला तरी, भाव चांगला मिळू लागल्याने वाढलेल्या आवकेमुळे कांद्याच्या भावात काही प्रमाणात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. जेवणात सर्वांनाच हवाहवासा वाटणारा कांद्याचा दर जसा ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणतो, तसाच तो सरकारसाठीही कायम डोकेदुखी ठरतो. कांद्याचे दर घसरले तर शेतकºयांचा रोष व भाववाढ झाली तर ग्राहकांचा दबाव ठरलेला असल्याने यंदा आॅगस्ट महिन्यात कांद्याने घेतलेल्या तेजीचा धसका थेट केंद्र सरकारनेच घेतला. त्यासाठी केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या अधिकाºयांनी नाशिकला भेट देऊन कांद्याची सद्यस्थिती जाणून घेत, बाजारातील चढ-उताराची दैनंदिन माहिती घेण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्ह्णातून यंदा एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत १७२ रेल्वेच्या रेकमधून कांदा हरियाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र, गुजरात, मध्य प्रदेश व बिहार या प्रमुख राज्यांमध्ये पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण अवघे ४७ रेक इतके होते. सर्वच राज्यांतून नाशिक जिल्ह्णातील कांद्याला मागणी कायम आहे.
कांद्याची टंचाई जाणवणार नाही
एकाच महिन्यात कांद्याचे सरासरी भाव १३०० रुपयांनी गडगडले आहे. मागील महिन्यात कांद्याचे २८०० रुपये क्विंटल असलेले भाव कालपर्यंत १५०० रुपये क्ंिवटलवर स्थिरावले आहेत. कांद्याच्या किमान हमीभावाचा विचार केला, तर कांद्याला एका क्विंटलला साधारणत: ९०० रुपये खर्च येतो. किमान हमीभाव ५० टक्के धरला, तर ४५० रुपये अधिक ९०० मिळून कांद्याला किमान हमीभाव १३५० रूपये जातो. आजमितीस सरासरी कांदा १५०० रुपये क्ंिवटल दराने विकला जात आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढत नसून स्थिर आहेत. जिल्ह्णातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची दररोजची आवक सुमारे सव्वादोन ते अडीच लाख क्विंटल आहे. गेल्या दोन वर्षांत कांदा उत्पादकाने तोट्यातच कांदा विकला आहे. यंदा कधी नव्हे ते दोन पैसे शेतकºयाला मिळू लागले आहेत. त्यामुळे सरकारने तेही लक्षात घेतले पाहिजे. मध्य प्रदेश सरकारने ८०० रुपये किमान हमीभावाने कांदा खरेदी केल्याने मध्य प्रदेशातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री केला. आता दक्षिणेतून लाल कांदा बाजारात येऊ लागला आहे. मध्यंतरी महापुरामुळे गुजरात व राजस्थानचा कांदा बाजारात आला नाही. मात्र कांद्याची जिल्ह्णात व राज्यात आवक चांगली असून, कोणतीही टंचाई तूर्तास तरी जाणवणार नाही. कधी तरी भाववाढ झाली म्हणून लगेचच कमिटी पाठवून केंद्र सरकारने अहवाल मागविण्याचा प्रकार म्हणजे, ‘आग सोमेश्वरी अन्् बंब रामेश्वरी’ पाठविण्याचा आहे. सरकारने कांद्याला किमान हमीभावाचा दर लक्षात घेणे आवश्यक आहे.