शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजावर
By admin | Published: April 6, 2017 02:03 AM2017-04-06T02:03:52+5:302017-04-06T02:04:06+5:30
नाशिक : शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.
नाशिक : वाढत्या लोकसंख्येबरोबर शेतीचे तुकडे होत असून जागतिक हवामान बदलामुळे शेती अनेक समस्यांच्या विळ्ख्यात सापडल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतीतील नुकसानीमुळे अन्नदाता बळीराजा कोलमडून पडण्याआधीच त्याला आधार देण्याची गरज असून, शेतकरी जगविण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची असल्याचा सूर गिरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केला.
गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे महाकवी कालिदास कलामंदिर येथे बुधवारी (दि. ५) आयोजित सोहळ्यात ‘गिरणा गौरव पुरस्कार २०१७’ चे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक फ. मुं. शिंदे यांच्यासह विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले, ज्येष्ठ पत्रकार आदिनाथ चव्हाण, समीरन वाळवेकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती आणि शेतकरी जगविण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्याचप्रमाणे माध्यमांनीही कृषी क्षेत्राला वाहिलेले सदर, वृत्तपत्रांसोबतच, राज्यस्तरावर मराठी भाषिक कृषी वाहिनी सुरू करण्याची गरज व्यासपीठावरील मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी आनंद अॅग्रोचे अध्यक्ष उद्धव अहिरे यांनी व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव मांडला. या ठरावाला उपस्थित शेतकऱ्यांनी हात उंचावून समर्थन दिले. पुरस्कार वितरण सोहळ््याच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांनी ‘राज्य म्हणे जनतेचे’ आणि ‘आई’ कविता सादर केली.
दरम्यान, अहिरे यांच्या ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या ‘वाटचाल’ स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक वैशाली अहिरे यांनी, तर सूत्रसंचालन किशोरी केनीकर यांनी केले.