‘झुलेलाल’च्या संचालकांवर नुकसानीची जबाबदारी
By Admin | Published: February 18, 2016 12:12 AM2016-02-18T00:12:00+5:302016-02-18T00:13:18+5:30
सहा कोटींची हानी : सहनिबंधकांना अहवाल
नाशिक : विनातारण कर्ज वाटपाबरोबरच स्वत:च्याच संस्थांना आर्थिक लाभ देणाऱ्या झुलेलाल पतसंस्थेच्या आजी-माजी संचालकांवर सुमारे सहा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका विशेष लेखापरीक्षकांनी ठेवला असून, या संदर्भात विभागीय सहनिबंधकांना अहवाल सादर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाशिकरोड येथील झुलेलाल पतसंस्थेत आर्थिक अनियमितता झाल्याच्या कारणावरून सहकार विभागाने प्रशासकाची नियुक्ती केली होती. संस्थेत अनागोंदी कारभार, बेकायदेशीर कर्जवाटप, विना तारण कर्ज मंजुरी त्याच बरोबर चुकीचे रिबेट वाटप, कर्ज मागणी अर्ज नसताना कर्जदाराच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या घेणे, कर्ज माफ करणे अशा अनेक कारणांमुळे पतसंस्था आर्थिक डबघाईस आल्याने सभासद तसेच गुंतवणूकदारांच्या ठेवी मिळणे मुश्कील झाले होते त्यामुळे सहकार खात्याने अगोदर कलम ८३ अन्वये पतसंस्थेचे लेखापरीक्षण केले असता त्यात तथ्य आढळून आले. पतसंस्थेच्या जवळपास सहा कोटी, १६ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण हे शोधण्यासाठी सर्व संचालकांची कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात येऊन त्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. अलीकडेच ही चौकशी पूर्ण होऊन झुलेलाल पतसंस्थेच्या आजी-माजी अध्यक्ष व संचालकांवर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम साधवानी, कै. आत्माराम देवाणी, कै. श्यामसुंदर रामनानी, फागुन डियलानी, मोहन मुखी, मोहन करीरा, कै. जियाराम घिरवानी, नारायणदास चावला, कै. नंदलाल मानसिंघानी, सविता दलवानी, सोनिया हिराणी, कै. श्याम ललवानी, रामकृष्ण कळमकर, अशोक बडवे, प्रल्हाद बलदेव, विनायक कुलकर्णी, नितीन राणे, अजित गोरवाडकर यांचा समावेश आहे. या सर्वांनी वेळोवेळी संगनमत करून संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, तसा अहवाल विभागीय सहनिबंधकांना पाठविण्यात आला आहे.