प्रतिबंधित क्षेत्र कागदावरच : जुन्या नाशकात नियमांचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 07:18 PM2020-07-12T19:18:18+5:302020-07-12T19:22:37+5:30
बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश
नाशिक : जुने नाशिक परिसरात बाहेरून येणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेड व बांबू बांधून बंद केले गेले; मात्र या प्रतिबंधित क्षेत्रात कुठल्याहीप्रकारे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सांगितलेल्या उपाययोजना व नियमांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. येथील अंतर्गत रस्त्यांवर सर्रासपणे दुचाकींचा वापरासह मास्क, 'डिस्टन्स'च्या नियमांनाही नागरिकांकडून हरताळ फासला जात आहे; त्यामुळे केवळ रस्ते बंद करून प्रशासनाकडून देखावा केला जात आहे का? असा संतप्त प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जुने नाशिकसह भद्रकाली परिसरात कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ लागल्याने प्रशासनाची झोप उडाली. या भागातील रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या भागाला भेट देत पाहणी केली. यावेळी या भागाला बाहेरून जोडणारे सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. पोलिस व मनपा कर्मचाऱ्यांनी जुन्या नाशकात येणाऱ्या सर्व वाटा बंद तर केल्या; मात्र अंतर्गत भागात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांकडून ज्याप्रमाणे नियमांचे पालन होणे गरजेचे आहे, त्याकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष केले. बाहेरून येणाऱ्यांसाठी रस्ते बंद आणि जुने नाशिककरांना मात्र रान मोकळे असेच एकूण चित्र या प्रतिबंधित क्षेत्रात दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी कठोरपणे अंमलात आणण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांकडून दिले गेले आहेत; मात्र याबाबतही फारसे समाधानकारक चित्र या भागात अद्याप दिसत नाही. लोकजागृतीमध्येही प्रशासनाला अयपश येत आहे. तसेच पोलिसांकडूनही नियमांची सक्ती केली जात नसल्याने जुने नाशिकमध्ये बाहेरून येणारे रस्ते बंद करून नेमके काय साध्य होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.