निर्बंध शिथिल झाल्याने अर्थचक्राला पुन्हा गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:27+5:302021-06-02T04:12:27+5:30
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मंगळवारी (दि. १) जवळपास दोन महिन्यांच्या ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मंगळवारी (दि. १) जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील बाजारपेठेतील दुकाने पुन्हा उघडल्याने अर्थचक्राला गती मिळाली आहे. निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याने सकाळी ७ वाजेपासूनच व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत दुकाने उघडली होती. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये ही कोरोना प्रतिबंधात्मक काळजी घेत आवश्यक त्या वस्तूंच्या खरेदीचा उत्साह दिसून आला.
नाशिक शहरातील निर्बंध होताच पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नाशिककरांनी गर्दी केली. दुकाने उघडी राहण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मर्यादित असल्याने अनेक नागरिक सकाळच्या सुमारासच खरेदीसाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा, मेनरोड, शालिमार, दूधबाजार व एम.जी. रोड परिसरात गर्दी होऊन काही ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नाशिक शहर आणि जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा फैलाव सुरू झाल्याने राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लागू केले होते. त्याचा परिणाम म्हणून मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली असून, त्यामुळेच बाजारपेठेतील अर्थचक्राला पुन्हा गती मिळू शकली आहे.
--
व्यापारी संघटनांच्या पाठपुरवा
नाशिक शहरतील बाजारपेठ पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स कन्फिडरेशन, ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनांच्या नाशिक शाखांसह स्थानिक कापड विक्रेता संघटना, सराफ असोसिएशन, किरकोळ विक्रेता संघटना आदी विविध व्यापारी संघटनांनी सातत्याने पाठपुरवा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, बाजारपेठेतील व्यवहार सुरू झाल्याने हजारो नागरिकांनाही त्याचे रोजगार पुन्हा मिळाले आहेत.
- इन्फो--
सोन्याला झळाली
शहरातील दोन महिन्यांपासून बंद असलेला सराफ बाजारदेखील मंगळवारी सुरू झाला. बाजार सुरू होताच सोन्याची मागणी वाढली असून, दरही वाढले आहे. मंगळवारी प्रति दहा ग्रॅम सोन्याला ५१ हजार २०० भाव मिळाला. सराफ व्यावसायिकांकडून नियमांचे कठोर पालन केले जात असून, ग्राहकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन व्यावसायिकांकडून केले जात आहे.