सिडको, सातपूरच्या बाजारांवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 01:06 AM2021-03-30T01:06:42+5:302021-03-30T01:07:02+5:30
कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आली.
सिडको : कोरोनाचा संसर्ग पाहता भाजी बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी सिडकोसह सातपूर व इंदिरानगर येथील मुख्य भाजी बाजार चारही बाजूंनी बंद करून फक्त एक मार्ग ठेवून नागरिकांना बाजारात सोडण्याबाबत पोलीस प्रशासन व मनपा अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्त तथा अपर जिल्हा दंडाधिकारी नाशिक शहर यांच्या आदेशान्वये अंबड, सातपूर व इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कोविडच्या अनुषंगाने बाजारपेठ भागात गर्दी कमी करणेकामी अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत परिसरातील भाजी बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण करण्यावर विचार करण्यात आला. अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील पवननगर मार्केट, सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोकनगर मार्केट व इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कलानगर मार्केट चारही बाजूने सील करून एकाच ठिकाणी एन्ट्री पॉइंट ठेवून प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीसाठी पावती देऊन व बाजारपेठेतील विक्रेते यांच्यासाठी पास देऊन गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील बिअरबार रात्री आठ वाजेनंतरही सुरूच राहात असल्याबद्दल वारंवार सूचना देण्यात आल्या; परंतु तरीही नियम पाळले जात नसल्याचे पाहून, पोलिसांनी सदरचा बार सील करून या ठिकाणी बसलेल्या ग्राहकांबरोबरच बारमालकावरही कारवाई केली. गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरल्याने नागरिकांची धावपळ उडत आहे.