पथकाच्या पाहुणचारावर प्रतिबंध
By admin | Published: January 28, 2017 11:09 PM2017-01-28T23:09:32+5:302017-01-28T23:09:52+5:30
स्वच्छ सर्वेक्षण : केंद्र सरकारचे मनपाला निर्देश
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत स्वच्छ शहरांच्या यादीत झळकविण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागणारे केंद्रीय पथक लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्यानंतर केंद्र सरकारने आता महापालिकांना पत्र पाठवून पथकाच्या पाहुणचारावर प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे, दोन दिवस नाशकात आलेल्या पथकाला तीर्थाटनासह पाहुणचाराला मुकावे लागणार आहे. मात्र, या पथकावर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकाची मात्र निवास-भोजनाची व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत केंद्रीय पथके ठिकठिकाणी शहरांमध्ये फिरत आहेत. यंदा देशभरातील ५०० शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणाची स्पर्धा होत आहे. नाशिकमधील स्वच्छतेसह अन्य कामांची माहिती घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी (दि.२७) दाखल झाले. तत्पूर्वी, मागील सप्ताहातच औरंगाबाद येथे सर्वेक्षणासाठी पाहणी करण्याकरिता आलेल्या पथकाने शहराचा क्रमांक यादीत आणण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेने खळबळ उडून विरोधकांनी भाजपा सरकारच्या या स्वच्छ सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सदर घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आणि स्पर्धेत सहभागी महापालिकांना पत्र पाठवून सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था अथवा त्यांचा पाहुणचार करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे, शुक्रवारी नाशकात दाखल झालेल्या पथकाने चहापानासाठीही महापालिकेत हजेरी लावली नाही आणि अधिकाऱ्यांनीही त्याबाबत विचारणा केली नाही. दरम्यान, या पथकावर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निरीक्षक नियुक्त केला असून, त्यांची मात्र व्यवस्था करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.