नाशकात सायंकाळी सात वाजेनंतर निर्बंध ! सायंकाळपासून पहाटे ५ पर्यंत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 07:13 PM2020-06-30T19:13:44+5:302020-06-30T19:16:34+5:30
कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.
नाशिक : कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे सायंकाळी ७ नंतर जे नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्याच धर्तीवर नाशिकमध्येही लॉकडाऊनबाबत चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीनंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली. जिल्ह्यातील बाधित आणि बळींमध्ये ज्येष्ठ नागरिकांबरोबरच मध्यमवयीन गटातील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. महानगरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, त्यामुळेच नाशिक शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सायंकाळी ७ वाजेनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाºयांवर पोलीस कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.