कोरोनामुळे वीरांच्या मिरवणुकीवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:09 AM2021-03-29T04:09:18+5:302021-03-29T04:09:18+5:30
पंचवटी : नाशिकमध्ये होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धूलिवंदनला (धुळवड) वीर मिरवण्याची प्रथा आहे, मात्र कोरोना विषाणूचा ...
पंचवटी : नाशिकमध्ये होळी सणाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धूलिवंदनला (धुळवड) वीर मिरवण्याची प्रथा आहे, मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने व त्यातच गंगाघाटावर धूलिवंदन वीर मिरवणुकीत सायंकाळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने रविवारी मध्यरात्री ते सोमवारी (दि.२९) रात्रीपर्यंत संपूर्ण रामकुंड व गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने यंदा शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पारंपरिक वीरांच्या मिरवणुकीला खंड पडणार आहे.
शहरात होळी सण उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धूलिवंदनाला कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण व्हावे यासाठी वीर नाचविण्याची प्रथा आहे. लाल कपड्यात खोबऱ्याची वाटी व त्यात वीराचा टाक गुंडाळून भंडारा लावत होळीनंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुळवडीच्या दिवशी पेटत्या होळीभोवती फेर धरून वीर नाचविले जातात. वीर मिरवण्याची शेकडो वर्षांची परंपरा असून, गंगाघाटावर वीरांची मिरवणूक बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविक येत असतात.
धुळवडीच्या दिवशी वीर मिरवणुकीत विविध देवदेवता तसेच महापुरुष यांचा पेहराव करून आकर्षक सजलेले आबालवृद्ध वीर गंगाघाटावर बघायला मिळतात. गंगाघाटाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालेले असल्याने धुळवडच्या दिवशी वीर नाचवत गंगाघाटावर आणण्याची प्रथा आहे. गेल्या वर्षापासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने सर्व राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम सण-उत्सव यावर निर्बंध लादले आहेत.
सोमवारी धूलिवंदन असल्याने सायंकाळी गंगाघाटावर वीर मिरवणूक बघण्यासाठी तसेच वीर नाचण्यासाठी शहरातील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने व त्यातून विषाणूंचा फायदा होऊन संसर्ग होण्याची भीती निर्माण होऊ शकते. संसर्ग रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने रविवारी रात्रीपासून ते सोमवारी रात्रीपर्यंत संपूर्ण गंगाघाट तसेच रामकुंड परिसरात संचारबंदी लागू केली आहे तसेच वीर मिरवणुकीसह वाहनांनादेखील परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे.