रस्ता वाहतुकीवर निर्बंध मात्र रेल्वेने प्रवासाला मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:59+5:302021-04-24T04:14:59+5:30
नाशिक रोड : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करुन जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेने ...
नाशिक रोड : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी करुन जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेने राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी कोणतीही जिल्हाबंदी नाही. त्याचवेळी महाराष्ट्रातून इतर महत्त्वाच्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र सर्वत्र आहे. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून ३० मेपर्यंत राज्यात राज्य सरकारने कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरु केली आहे. औषधाची दुकाने वगळता इतर अत्यावश्यक दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच सुरु आहेत. तसेच राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली असून, योग्य कारण व परवानगी असेल तरच संबंधिताला प्रवास करता येणार आहे. रस्तेमार्गे वाहतूक करणाऱ्यांना कडक निर्बंध लावलेले असताना दुसरीकडे मात्र रेल्वेने राज्यात विविध भागात जाण्यासाठी कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. तथापि, राज्यातून रेल्वेमार्गे मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तरप्रदेश या राज्यांत जाण्यासाठी संबंधित प्रवाशाला ७२ तास अगोदरचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व सर्वत्र निर्माण झालेली भययुक्त परिस्थिती यामुळे आगामी चार महिन्यापर्यंत करुन ठेवलेले रेल्वेचे आरक्षण तिकीट रद्द करण्यासाठीही काही प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे.