नाशिकमध्ये दुकानांबरोबरच दुध विक्रीच्या वेळेवर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 07:37 PM2020-04-21T19:37:25+5:302020-04-21T19:41:17+5:30
नाशिक : कोरोना आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी, संचारबंदी आदेशही लागू केले गेले आहेत. शहरात मंगळवारी (दि.२१) याबाबत काहीशी विरुद्ध स्थिती निर्माण झाली. नाशिककरांनी लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेत रस्त्यावर येत विविध भागात खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या वेळेबाबत शिथील केलेले निर्बंध पुन्हा कडक कररण्यात आले आहेत.
नाशिक : कोरोना आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच जमावबंदी, संचारबंदी आदेशही लागू केले गेले आहेत. शहरात मंगळवारी (दि.२१) याबाबत काहीशी विरुद्ध स्थिती निर्माण झाली. नाशिककरांनी लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेत रस्त्यावर येत विविध भागात खरेदीसाठी गर्दी केली. त्यामुळे अत्यावश्यक सेवांच्या वेळेबाबत शिथील केलेले निर्बंध पुन्हा कडक कररण्यात आले आहेत.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात भाजीपाला, फळे, किराणा माल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडणे आणि विक्री करणे यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेचे बंधन राहील. तसेच किरकोळ दूध विक्रीकरिता सकाळी ६.०० ते ७.३० वाजेपर्यंत आणि दुपारी ४.०० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत परवानगी राहील. यावेळे व्यतिरिक्त आस्थापनासुद्धा पूर्णपणे बंद राहतील. वैद्यकीय सेवा, वैद्यकीय आस्थापना आणि मेडिकल स्टोअर्स यांकरिता हे प्रतिबंध लागू असणार नाहीत, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
पुढील लॉकडाउन कालावधीत प्रतिबंधित असणाºया बाबी आणि सूट दिलेल्या बाबी याबाबत विविध अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. यानुसार शहरासह जिल्ह्यात कन्टेन्मेन्ट झोन जाहीर केले गेले आहेत. या झोनमध्ये कोरोनाचे रुग्ण यापूर्वी आढळून आले आहेत, त्यामुळे अशा झोनमध्ये समाविष्ट होणाºया भागात कुठल्याही प्रकारची सूट व सवलत कोणत्याही अस्थापनांना लागू असणार नाही तसेच ज्या परिसरात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून येतील त्या भागात नव्याने कन्टेन्मेन्ट झोन जाहीर केले जाईल आणि त्यानंतर तेथेही याच पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्याचे रुतलेले अर्थचक्र फिरविण्यासाठी सरकारने सोमवार (दि. २१) पासून लॉकडाउन काहीसा सैल करण्याचा प्रयत्न करत आपापल्या कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत कारखाने व काही आस्थापना सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविला. लॉकडाउनबाबत नागरिकांनी गैरसमज करून न घेता विनाकारण घराबाहेर येऊ नये यासाठी राज्य सरकारकडून नवीन सुधारित आदेशदेखील काढण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनीही मंगळवारी याबाबत स्पष्टीकरण देणारे आदेश नव्याने पारित केले.
या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी परस्पर संपर्क होऊन संसर्ग वाढू नये, म्हणून लॉकडाउनला केंद्र सरकारच्या आदेशानुसार ३ मेपर्यंत मुदतवाढ देणेत आलेली आहे तसेच काही आस्थापना सुरू करणेबाबत अटी व शर्ती घालून देत सवलत देण्यात आली आहे, मात्र नागरिकांनी याचा कुठल्याही प्रकारे चुकीचा अर्थ काढून विनाकारण लॉकडाउनला बाधा निर्माण करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध साथरोग प्ररिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मांढरे यांनी दिला आहे.