जिल्हा न्यायालयात वृद्धाचा आत्महत्त्येचा प्रयत्न जमिनीचा निकाल विरोधात गेल्याचा परिणाम : वृद्ध इगतपुरी तालुक्यातील
By admin | Published: January 28, 2015 02:07 AM2015-01-28T02:07:50+5:302015-01-28T02:08:45+5:30
जिल्हा न्यायालयात वृद्धाचा आत्महत्त्येचा प्रयत्न जमिनीचा निकाल विरोधात गेल्याचा परिणाम : वृद्ध इगतपुरी तालुक्यातील
नाशिक : सुमारे चार महिन्यांपूर्वी जमिनीच्या दाव्याचा निकाल विरोधात गेल्यानंतर कागदपत्रे देण्यासाठी मंगळवारी सकाळी जिल्हा न्यायालयात आलेले इगतपुरी तालुक्यातील वृद्ध शेतकरी प्रभाकर तात्या मोंढे (७०) यांनी न्यायालयाच्या बाहेर विषारी औषध प्राशन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मोंढेंविरोधात आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आडसरे बु़ येथील सत्तर वर्षीय वृद्ध शेतकरी प्रभाकर तात्या मोंढे यांच्या जमिनीचा जिल्हा न्यायालयात दिवाणी दावा सुरू होता़ या दाव्याचा निकाल मोंढे यांच्याविरुद्ध लागला़ या दाव्यातील काही कागदपत्रे देण्यासाठी मंगळवारी सकाळी मोंढे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे़ सी़ शिरसाळे यांच्या न्यायालयात गेले होते़ साडेअकरा वाजेच्या सुमारास न्यायाधीशांनी त्यांना ही कागदपत्रे असलेले पाकीट न्यायालयाच्या आवक -जावक विभागातील कारकुनाकडे देण्यास सांगितले़ यानंतर मोंढे न्यायालयाबाहेर पडत असताना त्यांनी खिशातून विषारी औषधाची बाटली काढली व तोंडाला लावण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रकार तेथील शिपाई कोरडे यांच्या लक्षात येताच त्यांनी मोंढे यांच्या हाताला धक्का दिला व बाटली व तिच्यातील औषध खाली सांडले़