आंदोलनाचा परिणाम : दोन दिवसांत ३३ हजार किलोमीटरचे बुडाले उत्पन्न एसटीचे कोट्यवधींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:09 AM2018-01-05T01:09:16+5:302018-01-05T01:09:57+5:30
नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
नाशिक : शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, दोन दिवस बंद असलेल्या बसेसमुळे नियमित उत्पन्न तर बुडालेच शिवाय आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करून १५ गाड्यांचे नुकसान केल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी यापेक्षा अधिक मोठे आर्थिक नुकसान असण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
कोरेगाव भीमा येथील वादानंतर राज्यभरात निर्माण झालेल्या तणावानंतर संतप्त जमावाकडून बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. नाशिकमध्येदेखील दोन दिवसांत सुमारे १५ बसेसचे काचा फोडून नुकसान करण्यात आले, तर चालकालादेखील मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शहरातील विविध भागात एकूण ११ बसेसचे नुकसान करण्यात आले, तर दुसºया दिवशीच्या आंदोलनात चार बसेसला लक्ष्य करण्यात आले होते. एकूण १५ बसेसचे सुमारे दोन लाख ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महामंडळाने वर्तविला आहे. बसेसच्या नुकसानीमुळे लाखो रुपयांचा फटका महामंडळाला बसलाच शिवाय दोन दिवस बसेस बंद कराव्या लागल्यामुळेदेखील नियमित मिळणारे उत्पन्न मिळू शकले नाही. मंगळवारी झालेल्या आंदोलनात दुपारनंतर टप्प्याटप्पयाने बसेस बंद करण्यात आल्या त्यामुळे त्या दिवशी अंदाजे ११ लाखांचे नुकसान झाले, तर दुसºया दिवशी पूर्णपणे सर्व मार्गांवरील बसेस बंद असल्याने महामंडळाचे सुमारे ८५ लाखांचे नुकसान झाले. केवळ प्रवासी उत्पन्नाचे दोन दिवसांत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला दोन दिवसांत कोट्यवधींचा फटका बसला असताना तिसºया दिवशीही अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. शिवाय बसही पूर्ण क्षमतेने सोडण्यात आल्या नसल्याने काही प्रमाणात उत्पन्न घटले. नियमित उत्पन्नात घट झाल्यामुळे नाशिक विभागाचा उत्पन्नाचा आलेखही यामुळे खाली आला आहे.