निवडणुकीच्या जबाबदारीने निकाल लांबतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:51 PM2019-03-13T23:51:13+5:302019-03-14T00:07:47+5:30
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे
नाशिक : राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु हे पेपर तपासणीचे काम सुरू असतानाच शिक्षकांवर लोकसभा निवडणुकीच्या विविध कामांची जबाबदारी सोपविली जात आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला विलंब होऊन दहावी व बारावीचे निकालही लांबतील, असा इशारा देताना निवडणूक प्रक्रियांच्या कामातून परीक्षेची जबाबदारी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन व माध्यमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे.
निवडणुकीच्या कामात शिक्षक-प्राध्यापकांना गुंतविल्यामुळे निकाल उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रक्रियेत व्यस्त असलेले जिल्ह्यातील तीन हजार प्राध्यापक-शिक्षकांना निवडणूक कामांतून वगळण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी निवडणूक आयोग राज्य सरकारला निवेदन देणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यापूर्वी शिक्षकांनी केलेल्या असहकार आंदोलनामुळे उत्तरपत्रिका तपासणी, मूल्यमापनाच्या कामास यंदा आठ दिवस उशिराने सुरुवात झाली आहे. एकीकडे बारावीच्या परीक्षा सुरू असताना निकाल वेळेवर लागावा, यासाठी तपासणी व मूल्यमापन प्रक्रियेला गती दिली जाते आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेचेही पेपर तपासण्याचे काम सुरू झालेले आहे. त्यामुळे या कामात बहुतांश शिक्षक व्यस्त असून. उर्वरित शिक्षकांवर दहावी-बारावीच्या परीक्षा संपताच अकरावीच्या परीक्षा व प्रवेशप्रक्रियेचे काम लागणार आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक कामांमध्ये प्राध्यापक, शिक्षक अडकले तर मूल्यमापन प्रक्रियेवर परिणाम होऊन निकाल जाहीर होण्यास विलंब होईल, असा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विभागीय शिक्षण मंडळासह निवडणूक प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील शिक्षकांवरील जबाबदारीविषयी प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षकांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनामुळे यंदा बारावीचे पेपर तपासणीला आठ दिवस उशिराने सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास तीन हजार शिक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहे. बारावीची पेपर तपासणी सुरू असतानाच अकरावीची परीक्षा घेऊन त्यांचाही निकाल जाहीर करावा लागणार आहे, तर दहावीची परीक्षा संपताच अकरावीची प्रवेशप्रक्रियाही सुरू होते. अशावेळी शिक्षकांना मतदानप्रक्रियेचे काम दिल्यास बारावीची पेपर तपासणी आणि निकालावर परिणाम होऊन निकाल लांबू शकतात. - प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ