राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर
By admin | Published: February 3, 2015 01:33 AM2015-02-03T01:33:57+5:302015-02-03T01:34:36+5:30
राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर
नाशिक : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल जाहीर झाले आहेत. चंद्रपूरच्या निवेदिता या संस्थेच्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाने ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले आहे. नागपूरच्या बोधी फाउंडेशनच्या ‘कमेला’ या नाटकाला द्वितीय (३० हजार), तर वाशीच्या टाऊन लायब्ररी संस्थेच्या ‘सारी रात’ नाटकाला तृतीय (२० हजार) पारितोषिक जाहीर झाले आहे. नाशिकच्या भगवान हिरे यांनी नाट्यलेखनाचे प्रथम (१५,०००), तर माणिक कानडे यांनी रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक (१०,०००) पटकावले आहे.
१० ते ३१ जानेवारी या कालावधीत नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेत एकूण ३३ नाट्यप्रयोग सादर झाले. प्रभाकर दुपारे, श्रीराम जोग, रमेश थोरात यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक संचालनालयाने सोमवार, दि. २ रोजी दुपारी जाहीर केला. त्यात संपदा सोनटक्के (दिल ढूॅँढता हैं), पूजा पिंपळकर (कमेला), पूजा वेदविख्यात (बदलती करवटें), डॉ. मनू मेनन (आओ तनिक प्यार करें), नूतन धवने (चिंधीबाजार), मयूर शितोळे (हिजडा), विनोद राऊत (कमेला), सुभाष लोखंडे (जानेमन), अक्षय जोशी (ना जाने क्यों), धनंजय धनगर (चिंधीबाजार) यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाली आहेत. (प्रतिनिधी)