पोलीस भरतीतील मैदानी परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:18 AM2018-04-05T01:18:58+5:302018-04-05T01:18:58+5:30
ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ८२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे़ या उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून, त्याचा निकालही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे़
नाशिक : ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ८२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे़ या उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून, त्याचा निकालही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे़ ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या ८२ रिक्त जागांसाठी आडगाव मुख्यालयातील मैदानावर २१ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते़ त्यामध्ये दहा हजार ७५० पुरुष तर महिला गटात एक हजार २०० उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. तर उर्वरित उमेदवारांपैकी काही गैरहजर तर काही अपात्र ठरले़ मैदानी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी संकेतस्थळ तसेच आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात लावण्यात आली आहे़
मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले तसेच प्रवर्गनिहाय पदसंख्येच्या १:१५ या प्रमाणात गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे़ पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी परीक्षेची तयारी सुरू आहे़ उत्तीर्ण उमेदवारांसाठी लेखी परीक्षा मार्गदर्शन
नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दोनदिवसीय लेखी सराव परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सामान्य अध्ययनाकरिता लेखी सराव परीक्षाही घेण्यात येणार आहे़ ६ व ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहर पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर १७ मध्ये हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे़ या शिबिरात अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीसाठी अमोल सोसे तर मराठी विषयासाठी निवृत्ती पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत़ उमेदवारांनी या मोफत शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले आहे़