केरळ सहलीच्या बुकिंगवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:17 AM2018-05-26T00:17:06+5:302018-05-26T00:17:06+5:30
केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे.
नाशिकरोड : केरळमध्ये ‘निपाह’ विषाणूंची लागण व फैलाव होत असल्याने त्याचा धसका पर्यटकांनी घेतला असून, केरळमध्ये सहलीसाठी होणाऱ्या बुकिंगवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी जम्मू, सिमला, कुलूमनाली या भागांना पसंती दिल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांचे म्हणणे आहे. केरळ राज्याच्या कर्नाटकाला लागून असलेल्या उत्तर भागातील ‘कलिकत’ भागामध्ये चार-पाच दिवसांपूर्वी ‘निपाह’ विषाणूंची लागण होऊन आतापर्यंत १३ पेक्षा अधिकजण मृत्युमुखी पडले आहेत. निपाहमुळे संपूर्ण केरळमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह विषाणूमुळे ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. निपाहच्या विषाणूचा परिणाम पर्यटकांवर झाला आहे. शाळा-महाविद्यालयांना १५ जूनपर्यंत सुट्या असल्याने देशाच्या विविध भागातून पर्यटक केरळमध्ये फिरण्यास येतात. मात्र निपाहच्या व्हायरसच्या भीतीमुळे काही पर्यटकांनी आपली नियोजित सहल रद्द केल्याचे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. गेल्या ८-१० दिवसांत केरळमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांना ट्रॅव्हल्स चालकांकडून फळे खाऊ नका व काळजी घेण्याबाबतच्या सूचना केल्या जात असून, पर्यटकांशी सतत संपर्क साधला जात आहे. यापूर्वीच जून महिन्यात केरळ सहलीचे केलेले सर्व नियोजन काही पर्यटकांनी रद्द केले आहे, तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून केरळच्या सहलीची नवीन बुकिंग बंद झाल्याचे ट्रॅव्हल्स चालकांनी सांगितले. केरळच्या दक्षिण भागातील कोचीन, मुनार, पेडियार, टेकडी, अॅलप्पी बॅक वॉटर, त्रिवेंद्रम, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई व कोचीन या भागातच जास्त करून पर्यटक फिरण्यास, सहलीसाठी जातात. या भागापासून केरळच्या उत्तर भागातील कलिकत जेथे निपाह विषाणूची लागण झाली आहे. हा भाग खूप दूर आहे तरीदेखील केरळ सहलीच्या बुकिंगसाठी ट्रॅव्हल्स चालक पाठविण्याची रिस्क घेण्यास तयार नाही. केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटकांनी हिमाचलातील कुलुमनाली, सिमला, जम्मू, कटरा, वैष्णवदेवी, पंजाब, अमृतसर या भागात पर्यटनासाठी प्राधान्य दिले आहे. या भागात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
यापूर्वी ज्यांनी केरळ सहलीचे नियोजन केले होते त्यापैकी काही जणांनी ‘निपाह’ विषाणू संसर्गामुळे सहल रद्द करून किंवा पुढे दिवाळीत सहलीचे नियोजन केले आहे. मात्र नव्याने जून महिन्यासाठी होणारी केरळ सहलीची बुकिंग जवळपास बंदच झाली आहे. यापूर्वी जे पर्यटक केरळला सहलीसाठी गेले आहेत त्यांच्या संपर्कात आहे.
- नंदू थेटे, साई शिवम टुर्स ट्रॅव्हल्स