खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची पुन्हा लागवड सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 04:04 PM2020-12-18T16:04:13+5:302020-12-18T16:07:59+5:30
खामखेडा : कधी परतीचा पाऊस तर कधी हवामानातील बदलामुळे वाया गेलेल्या लागवडीमुळे न डगमगता परिसरातील शेतकऱ्याने जिद्द कायम ठेवत उशीरा का होईना उन्हाळ कांद्याची लागवड जोमाने सुरु केल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
दरवर्षी उन्हाळ कांदा लागवडीला साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाते. परंतु चालू वर्षी शेतकऱ्यांनी दोन वेळेस उन्हाळी कांद्याचे बियाणे टाकले परंतु परतीच्या पावसामुळे सुरवातीचे बियाणे दाबली गेली. त्यानंतर महागडी बियाणे घेऊन लागवड केली परंतु पुन्हा तुरळक पाऊस व वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लावणीस आलेली कांद्याची रोपे वाया गेली.तरीदेखील निराश न होता शेतकऱ्यांनी पुन्हा कांद्याचे बियाणे टाकली. ती आता लागवड योग्य झाल्याने खामखेडा परिसरात सर्वत्र कांदा लागवड होताना दिसून येत आहे.
यावर्षी कांद्याची उशीरा लागवड होत असल्याने कालांतराने विहिरींना पाणी कमी होण्याचा धोका लक्षात घेऊन शेतकरी आता पांरपारिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक ठिबक सिंचन ,तुषार सिंचन ,गादी वाफा पद्धतीने कांदा लागवड करतांना दिसत आहेत. त्यामुळे पिकावर रोगाचा प्रदुर्भाव होत नाही तसेच पाणी वीज व श्रमाची बचत होते. यासाठी शेतकरी सिंचन पद्धतीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. उशीरा होणाऱ्या या लागवडीसाठी मजुरांची टंचाई असल्याने बाहेरुन मजूर आणण्याची कसरत करावी लागत आहे. तसेच वीजपुरवठ्याच्या वेळा लक्षात घेऊन लागवड करण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आली आहे.