शहरात पुन्हा संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:35 PM2018-08-20T17:35:19+5:302018-08-20T17:37:06+5:30

Resurrection in the city | शहरात पुन्हा संततधार

शहरात पुन्हा संततधार

googlenewsNext
ठळक मुद्दे शनिवारपासून पावसाने शहरात विश्रांती घेतली होती. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. हलक्या सरींच्या संततधारेने नाशिककर चिंब झाले.

नाशिक : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात सोमवारी (दि.२०) सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या हलक्या सरींच्या संततधारेने नाशिककर चिंब झाले.
मागील शनिवारपासून पावसाने शहरात विश्रांती घेतली होती. शुक्रवारी शहरात दमदार हजेरी लावल्याने दिवसभरात ५.६ मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. सोमवारी सकाळपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाली. शहरात दुपारनंतर पावसाच्या सरींच्या संततधारेचा वेग वाढला होता. यामुळे रस्त्यांवरील वर्दळ प्रभावीत झाली. रस्त्यांवर फळविक्री करणाऱ्यांसह अन्य विक्रेत्यांचे हाल झाले. तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संध्याकाळी घरी परतताना हाल झाले. वाहतुक मंदावल्याचे चित्र होते. नाशिककर दिवसभर रेनकोट परिधान करुन दैनंदिन कामे आटोपताना दिसून आले.
रुसलेल्या वरुणराजाने मोठ्या विश्रांतीनंतर का होईना मागील गुरूवारपासून नाशिककरांवर पुन्हा कृपादृष्टी केली. श्रावणाच्या सहाव्या दिवशी नाशिककर मोठ्या प्रतिक्षेनंतर ओलेचिंब झाले होते. सकाळपासून ढगाळ हवामान कायम होते. सकाळी रिमझिम वर्षाव काही प्रमाणात सुरू झाला. दिवसभर शहरवासियांना सुर्यदर्शन घडू शकले नाही. नाशिककर पुन्हा रेनकोट, छत्र्या घेऊन घराबाहेर पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. दिवसभर सुरू असलेल्या हलक्या सरींमुळे शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. श्रावणसरींच्या वर्षावामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त झाले. धरणसाठा ९१ टक्क्यांवर पोहचला आहे. संततधार पावसामुळे शहरातील गटारी, नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोदापात्राची पाण्याची पातळीही वाढली आहे.


काश्यपी ९६ तर गौतमी धरणाचा जलसाठा ८६ टक्क्यांवर पोहचला आहे. २४ तासांत मध्य व उत्तर महाराष्टÑात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आज आणि उद्या शहरात मुसळधार पाऊस होण्याची चिन्हे आहे.

Web Title: Resurrection in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.