कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:56 PM2020-05-15T21:56:41+5:302020-05-15T23:38:36+5:30

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही.

Rethink Corona Hospital! | कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

कोरोना रुग्णालयाचा फेरविचार करा!

Next

सटाणा : बागलाणमध्ये प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विलगीकरण केंद्र निर्माण करताना आणि कोरोना रुग्णालय घोषित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलेले नाही. आरोग्य यंत्रणेने आणि प्रशासनाने जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याबरोबरच कोरोना रुग्णालयाच्या बाबतीत फेरविचार करावा अन्यथा होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांनी आढावा बैठकीत दिला.
राधाई मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.१५) खरीप हंगाम आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, कृषी, जलसंपदा, सहकार, महसूल आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी उभयतांनी इशारा दिला. देशावर कोरोनासारखे महासंकट आले आहे. याचा सामना करतांना शेती व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या बांधांवर खते आणि बियाणे कसे उपलब्ध करता येईल याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी आमदार बोरसे यांनी दिल्या. शेतीशी निगडित वस्तू खरेदी करण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी अडवणुकीचे धोरण न राबविता सहकार्याचे धोरण राबवावे जेणेकरून येणारे खरीप पीक शंभर टक्के आपल्या हातात येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले. बागलाण हा ग्रीन झोनमध्ये होता मात्र प्रशासन ते टिकविण्यात कमी पडल्याचा ठपका खासदार डॉ. भामरे यांनी ठेवला. लोंढे रोखण्यात अपयश आल्यामुळेच तीन कोरोनाबाधित बागलाणमध्ये आढळले आणि ते मालेगावच्या संपर्कात आल्याचेही स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीतीही भामरे यांनी व्यक्त केली. कोरोना रुग्णालय तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात ना घेतल्यामुळे प्रशासनाबद्दल जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याबाबत तत्काळ फेरविचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना देण्यात आल्या. बैठकीस नगराध्यक्ष सुनील मोरे, विजयकुमार भांगरे, जितेंद्र इंगळे पाटील, सुधाकर पवार, बांगर, हेमंत अहिरे, अभिजित रौंदळ, राजेंद्र सूर्यवंशी, महेश भडांगे, मुख्य अधिकारी हेमलता डगळे आदी उपस्थित
होते.
------------------------
हरणबारीमधून पाणी सोडले...
बागलाण तालुक्यातील मोसम नदीकाठच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कोलमडल्या होत्या. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्याने ती दूर करण्यासाठी शुक्रवारी (दि.१५) हरणबारी धरणातून ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग मोसम नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली. हरणबारी धरणातील ६२३ दशलक्ष घनफूट या उपलब्ध पाणी साठ्यापैकी ३२० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. या आवर्तनामुळे बागलाणसह मालेगाव तालुक्यातील तब्बल ८० गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत होऊन पाणी संकट दूर होणार आहे. तसेच नदीकाठच्या गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

Web Title: Rethink Corona Hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक