इशान्येतील शिक्षणासाठी निवृत्त शिक्षकांनीही योगदान द्यावे-जयवंत कोंडविलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 07:02 PM2019-12-15T19:02:04+5:302019-12-15T19:03:41+5:30
पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.
नाशिक : ईशान्य भारतातील पूर्वांचल भागातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी पूर्वांचल विकास समितीकडून शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता माध्यमातून शाळा सुरू करून सुरुवात केली आहे. या उपक्रमात शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनीही सहभागी होत आपले योगदान देण्याचे आवाहन पूर्वसीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह जयवंत कोंडविलकर यांनी केले.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे रुंग्टा हायस्कूलचे माजी शिक्षक भय्याजी काणे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि.१४) जु. स. रुंग्टा विद्यालयाच्या सभागृहात ‘शिक्षणातून राष्ट्रीय एकात्मता’ विषयावर ते बोलत होते. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कलाल यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या जयंती सोहळात व्यासपीठावर जनकल्याण समितीचे अध्यक्ष जयवंत कुलकर्णी, सचिव अश्विनकुमार येवला उपस्थित होते. जयवंत कोंडविलकर यांनी भय्याजी काणे यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पूर्वांचलमध्ये १९७३ मध्ये जाऊन होणारा विरोध झुगारीत नागरिकांचे मन जिंकू न पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अशाप्रकारे त्यांनी १९९३पर्यंत शेकडो मुले पूर्वांचलातून महाराष्ट्रात आणून महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबामध्ये त्यांना ठेवून त्यांच्या मनामध्ये भारताबद्दल प्रेम निर्माण केले. त्याच काळात काणे यांनी पूर्वसीमा विकास प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करतानाच या माध्यमातून पूर्वांचलमध्ये शाळा सुरू केल्या असून, आजही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, त्यांनी ईशान्य भारतातील आठ राज्यांतील भौगोलिक माहिती चलचित्रांच्या साह्याने उपस्थितांसमोर मांडतानाच ईशान्य भारतात सुरू असलेल्या शाळेत शिकविण्यासाठी महाराष्ट्रातून आवड असलेले शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अश्विनकुमार येवला यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले. यशश्री कचरेकर यांनी आभार मानले.