परतीच्या पावसाची दुसऱ्या दिवशीही हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 09:21 PM2018-09-19T21:21:39+5:302018-09-19T21:24:08+5:30
बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात ढग दाटून येण्याससुरूवात झाली. अवघ्या काही मिनिटांत थंड वारा सुटला आणि सरींचा वर्षावाला प्रारंभ झाला.
नाशिक : शहर व परिसरात परतीच्या पावसाने बुधवारी (दि.१९) दुसºया दिवशीही दुपारी हजेरी लावली. सुमारे तासभर कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसाने नाशिककरांची तारांबळ उडाली. संध्यकाळी साडेपाच वाजेपर्यंत १५.७ मि.मी इतक्या पावसाची नोेंद हवामान खात्याकडून करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी होता.
बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली. अवघ्या काही मिनिटांत थंड वारा सुटला आणि पावसाच्या सरींचा वर्षावाला प्रारंभ झाला. टपो-या थेंबांच्या सरींच्या जोरदार वर्षावाने नाशिककरांना पुन्हा चिंब भिजविले. सातपूर, गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, जुने सीबीएस परिसर, शालिमार, भद्रकाली, पंचवटी, अशोकामार्ग, वडाळागाव, इंदिरानगर आदि भागात पावसाने हजेरी लावली. सुमारे पावणेपाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. जवळपास पाऊणतास पावसाचा जोर काही भागात कायम राहिला तर काही भागात अर्ध्या तासानंतर रिपरिप सुरू होती. मंगळवारी अचानकपणे आलेल्या पावसाने नागरिकांच्या उडालेल्या त्रेधातिरपिटच्या तुलनेत बुधवारी कमी तारांबळ उडाली. कारण बहुतांश चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांनीही सकाळी घरातून बाहेर पडताना सोबत रेनकोट, छत्री घेतली होती. पावसाच्या हजेरीमुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत होईल असे नागरिकांना वाटत होते मात्र बुधवारीही कमाल तपमानाचा पारा अधिकच चढलेला राहिला. पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून ३०.२ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली. सलग दोन दिवसांपासून संध्याकाळी येणा-या परतीच्या पावसानंतरही सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणात उष्मा कायम राहत आहे. परतीच्या पावसाच्या हजेरीमुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.